दिलीप मिसाळ
गल्ले बोरगाव : उखळ, पाटा-वरवंटा बनविणारे कारागीर खान्देशमधून चार-पाच कुटुंब गल्ले बोरगाव येथे पाच-सहा वर्षांपूर्वी आले. पण, त्यांना ग्राहक मिळत नसल्याने ते आता आपल्या गावी परतले आहेत. काहींनी दुसरा उद्योगधंदा निवडला असून, काही लोक मोलमजुरीसाठी लागले आहेत. यांत्रिकीकरणामुळे या समाजावर आता भटकंतीची वेळ आली आहे.
छन्नी-हातोड्याचे घाव घालून दगडापासून उखळ, पाटा-वरवंटा व जाते आदी वस्तू तयार करणारे आता जगण्यासाठी धडपड करीत आहेत. कारण, या सर्व दगडी वस्तूंची जागा आता मिक्सर, ग्राइंडरसारख्या इलेक्ट्रॉनिक साधनांनी जागा घेतल्याने या दगडी साधनांची मागणी संपली आहे. त्यामुळे हा व्यवसाय लोप पावला आहे.
घरात धान्य दळणे, मिरची कांडणे व मसाला वाटणे अशी सर्व कामे उखळ, पाटा-वरवंटा व जात्यावर केली जात असे. परंतु, आता स्वयंपाक घरात आलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी या गृहोपयोगी दगडी वस्तूंना हद्दपारच केले आहे. मात्र, या साधनांमुळे गृहिणींचे काम अधिक सोपे झाले असले तरी रोजगार मात्र काढून घेतला आहे. पूर्वी गावोगावी भटकंती करून उखळ, पाटा-वरवंटा, जातं अशा विविध गृहोपयोगी दगडी वस्तू विकायचे किंवा मागणीनुसार घडवून द्यायचे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मग ते तुटपुंजे का असेना समाधानाने जीवन जगायचे. परंतु, आता या वस्तूंची जागा इलेक्ट्रॉनिक साधनांनी घेतल्याने हा व्यवसायच लोप पावत चालला असून, पाथरवट समाजातील नवी पिढी अन्य व्यवसायांकडे वळली आहे. त्यापैकी काही लोकांवर रिक्षा, सेंट्रिंग काम, धुणी-भांडी ही कामे करण्याची वेळ आली आहे.
पाट्याची मागणी
जुनी साधने जाऊन नवीन साधने आली. मात्र, काही जुन्या साधनांनी आपली जागा आजही कायम ठेवली आहे. ‘पाटा’ हे त्यापैकीच एक साधन आहे. पाटा हा सपाट दगडापासून बनविला जातो. त्यासाठी पाथरवटांना अशा दगडांचा शोध घ्यावा लागतो. काही पाथरवट पाट्यांची निर्मिती करून ते आठवडा बाजारात विक्रीसाठी आणतात. पाट्याची किंमत तीनशे ते सहाशे रुपयांपर्यंत असते. पाटा निर्मिती हा एकमेव घटक नसला तरी याचीच काही अंशी मागणी असल्याने हातभार लावला जातो. तर आता पाटा टाचवणारे पाथरवट गावागावांत फिरून काम शोधत आहेत. पाटा टाचविण्यासाठी ५० रुपये असा दर असल्याची माहिती कारागिरांनी दिली.