हिंगोली : शहरातील खटकाळी बायपास भागातील कारवडी ग्रा. पं. अंतर्गत दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यास २० मार्चपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी भटकंती काही प्रमाणात थांबण्यास मदत झाली आहे. कारवाडी परिसरातील जलस्त्रोत अनेक दिवसांपासून कोरडे पडले आहेत. या भागातील नागरिकांनी एक बोअर कोरडा पडल्याने दुसरा बोअर घेतला आहे. तर काहींनी तोच बोअर अधिक खोल घालण्याचा प्रयत्न करुनही पाणीच न लागल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. पालिकेचे पाणी मागील वर्षीपासून या भागात पोहोचण्याचे नाव नाही. त्यामुळे कारवाडी ग्रा.पं.च्या वतीने पं.स. पाणीपुरवठा विभागाकडे टँकरचा प्रस्ताव दाखल केला होता. शिवाय पालकमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासन हलले. त्यावर गटविकास अधिकारी डॉ. विशाल राठोड व कर्मचाऱ्यांनी स्थळ पाहणी केली. पाहणीत परिसरातील जलस्त्रोत पूर्णत: कोरडे झालेले दिसून आले. त्यामुळे टँकरच्या प्रस्तावाला मान्यता देवून टँकर सुरू केले. दोन टँकर देणार असून त्यावर ठराविक भाग विभागून दिल्याचे ग्रामसेवक शिवाजी खरात यांनी सांगितले. यात एसटी कॉलनी, पुष्पक कॉलनी, वैष्णव नगर, सुुराणा नगर, सहकार नगर, राधे नगरी या भागात एक तर प्रगती कॉलनी, कांचन नगर, आशीर्वाद कॉलनी, ग्रामसेवक नगर, रामनगर, शांती नगर, आर्यन नगर, प्रकाश पार्क, रामाकृ ष्ण कॉलनी या परिसरातही एक टँकर उन्हाळाभर सुरू राहणार आहे. तरीही भागत नसल्यास आणखी एका टँकरची व्यवस्था केली जाणार असल्याचे गटविकास अधिकारी राठोड यांनी आश्वासन दिल्याचे ग्रामसेवक खरात म्हणाले. (प्रतिनिधी)
कारवाडी परिसरात अखेर टँंकरने पाणीपुरवठा सुरू
By admin | Published: March 20, 2016 11:20 PM