छत्रपती संभाजीनगर : 'जीवनाला कंटाळलो असून, सर्व काही सोडून जीवन संपविण्यासाठी निघून जात आहे. माझ्या कुटुंबाला सांभाळा' अशा आशयाची सुसाईड नोट लिहून नामांकित बिल्डरने सोमवारी सकाळी घर सोडले. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबातील सदस्यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिस शोध घेत असतानाच सायंकाळी बिल्डर सुखरूप घरी परतल्याची माहिती निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.
राहुल बसवंत नंदगवळी (४२, रा. उल्कानगरी) असे बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. जवाहरनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदगवळी यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता एक सुसाईड नोट लिहून घर सोडले होते. या नोटमध्ये त्यांनी फायनान्सकडून ७० लाख रुपये घेऊन कर्ज फेडावे, आणखी एका ठिकाणचे ४५ लाख रुपये पत्नीला द्यावेत असे वडील आणि सासऱ्याला उद्देशून लिहिले होते. कंटाळलो असून जीवन संपवायला निघून जात आहे. हीच देवाला प्रार्थना आहे की, माझ्या परिवाराला व्यवस्थित भविष्य द्या, जय श्रीराम असे लिहिल्याचेही जवाहरनगर पोलिसांनी सांगितले. निरीक्षक केंद्रे यांनी शोधासाठी विविध पथके स्थापन केली होती. तसेच तांत्रिक तपासालाही सुरुवात केली होती. सायंकाळी एका ठिकाणी नंदगवळी हे नातेवाईकास दिसले. त्यानंतर ते स्वत:च घरी परतल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
अनेक साईट केल्या विकसितराहुल नंदगवळी यांनी उल्कानगरी, सातारा परिसर, कांचनवाडी, तीसगाव, वाळूज सिडको महानगर, पडेगाव या ठिकाणी प्रकल्प उभे केले आहेत. सध्या त्यांचा कांचनवाडीत रो हाऊस, फ्लॅटचा एक मोठा प्रकल्प पूर्णत्वाकडे आहे. पडेगावात एक एकरमध्ये रो हाऊस आणि फ्लॅट्सचे काम अर्धवट असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.