- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: सततच्या त्रासाला कंटाळून सिल्लोड तालुक्यातील मांडणा येथील एका 35 वर्षीय महिलेने दोन वर्षांपूर्वी सासर सोडले. पोलिसांनी आता या महिलेला शोधून काढले असून ती गुजरातमध्ये दुसऱ्या पतीसोबत आनंदी असल्याचे दिसून आले. ही महिला दुसरा पती आणि एका मुलासोबत भारत-पाक सीमेवर राहत असून तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. महिलेस सिल्लोड येथे आणून पोलिसांनी शुक्रवारी तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मांडणा येथील भगवान गणपत लाड (40 ) याच्यासोबत भारती यांचे 8 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असे तीन अपत्य झाले. मात्र लग्नानंतर नवरा बायकोत नेहमी खटके उडत होते. पती दारू पिऊन भारतीस त्रास देत असे. तिला मजुरीसाठी पाठवीत असे. तसेच सासऱ्याचीसुद्धा तिच्यावर वाईट नजर होती. यास कंटाळून भारतीने 26 सप्टेंबर 2018 रोजी जोगेश्वरी देवीच्या दर्शनाला जाण्याचे कारण सांगत सासर सोडले. त्यानंतर शोध लागत नसल्याने तीचे वडिल हरी बन्सी अभग (60 , रा.धारला ता.सिल्लोड ) यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
दोन वर्षानंतर पोलिसांना भारती या गुजरात येथे असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंडित इंगळे, पोलीस हवालदार भागीनाथ वाघ, सचिन सोनार, दीपक इंगळे, मुश्ताक शेख, राहुल साळवे, सीता ठाकने या पथकाने गुजरात गाठले. गुजरात पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता ती कच्छ येथे आढळून आली. यावेळी भारती यांनी मी दुसरा विवाह केला असून एक मुल सुद्धा असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिला वडिलांनी केलेल्या तक्राराची माहिती देऊन सिल्लोड येथे आणले. यानंतर तिला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी दिली.
मी संसार थाटला, आता आनंदात आहेपहिला पती नेहमी त्रास देत असे. तसेच सासरी चांगली वागणूक मिळत नव्हती यामुळे सासर सोडले. यानंतर माझी ओळख मंजि मंगा थापडा ( रा.विरा ता.अंजार जि.कछभुज ) याच्यासोबत झाली. आम्ही लग्न केले असून आम्हाला एक मुलगा आहे. आता मी आनंदी असून आमचा संसार सुखात सुरू आहे. पाहिला पती नांदविण्यास तयार असला तरी मला त्याच्यासोबत राहायचे नाही. मी गुजरातला दुसऱ्या पती सोबत राहू इच्छिते. - भारती