वाळूज महानगर: रस्त्यावरील अतिक्रम हटविण्यासाठी तीसगाव ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ता रुंदीकरणात येणारे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली आहे.
तीसगाव ग्रामपंचायत कार्यालय रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे ये-जा करण्यासाठी वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची दुरावस्था झाल्याने ग्रामपंचायतीने ४२ लाख रुपये खर्चुन रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय ते भिमराव किर्तीशाही यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे.
नुकतेच या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. रस्ता रुंदीकरण कामात जवळपास ५३ अतिक्रमित मालमत्ता अडथळा ठरत असल्याने रस्त्याचे काम थांबले आहे. सदरील अतिक्रमण काढून घेण्यासाठी ग्रामपंचायतीने संबंधितांना नोटिसाही बजावल्या आहेत. पण संबंधित मालमत्ताधारकांकडून अतिक्रमण काढले जात नाही. त्यामुळे ग्रामंचायतीने पोलीस संरक्षणात अतिक्रमण मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने ग्रामपंचायतीने पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहारही केला आहे. पोलीस बंदोबस्त मिळताच अतिक्रमण मोहिमेला सुरुवात करुन सदरील अतिक्रमण निष्कासित केले जाणार आहे. असे सरपंच कौशल्याबाई कसुरे, उपसरपंच विष्णू जाधव व ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड यांनी सांगितले.
रस्ता होणार रुंद ..आज घडीला रस्त्याची दुरावस्था झाली आहे. शिवाय अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अरुंद रस्त्यामुळे विरुद्ध दिशेने चारचाकी वाहन आल्यास दुसऱ्या वाहनाला वळसा टाकून ये-जा करावी लागते. तसेच वाद-विवादाच्या घटनाही घडत आहेत. ग्रामपंचायत अतिक्रमण हटवून सिमेंट रस्ता तयार करणार असल्याने रस्ता रुंद व गुळगुळीत होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांची होणारी गैरसोय थांबणार आहे.