छत्रपती संभाजीनगर : शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीची वर्दळ प्रचंड वाढली आहे. रस्ते रुंद करण्यापेक्षा ते कमी खर्चात वन-वे करण्याचा प्रयोग मनपाने सुरू केला असून, संत एकनाथ रंगमंदिरासमोरील रोडचा प्रस्ताव स्मार्ट सिटीकडे पाठविण्यात आला आहे. स्मार्ट सिटीकडे ५० ते ५५ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. त्यात वाहतूक बेटही तयार केले जाईल.
२० ते २५ वर्षांपूर्वी शहराची लोकसंख्या कमी होती, वाहनांची वर्दळही फारशी नसताना अनेक रस्ते वन-वे होते. लेबर कॉलनी ते शहागंज, शहागंज ते सिटी चौक, सिटी चौक ते जुनाबाजार, सिटी चौक ते गुलमंडी इ. रस्त्यांचा यात समावेश होता. कालांतराने वन-वेचे बोर्ड गायब झाले. वाहनधारकांनीही नियमांचे पालन करणे बंद केले. सध्या शहराची लोकसंख्या बरीच वाढली आहे. वाहनांची संख्याही वाढल्याने रस्ते अपुरे पडत आहेत. सकाळी १० ते १२ आणि सायंकाळी ४ ते ७ पर्यंत अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात. त्यामुळे महापालिकेने संत एकनाथ रंगमंदिरासमोरील रस्ता वन-वे करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने स्मार्ट सिटीकडे सोपविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्मार्ट सिटी प्रशासनाने यासंदर्भात कोणतेही उत्तर मनपाला दिले नाही.असा राहील वन-वेक्रांतिचौकाकडून येणारी सर्व वाहतूक माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय यांच्या कार्यालयासमोरून झांबड इस्टेटकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर येईल. ज्योतीनगर, झांबड इस्टेटकडून उस्मानपुरा सर्कलकडे येणारी वाहतूक संत एकनाथसमोरून जाईल. या प्रक्रियेत काही ठिकाणी वाहतूक बेटे उभारावी लागणार आहेत.