छत्रपती संभाजीनगर : सजग नागरिक बनविण्यासाठी शालेय जिवनातच विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील कर्तव्य, मुल्य आणि अधिकारांची जाणीव करून दिली पाहिजे. बालवयातच संविधानाची मुल्ये रूजल्यास संबंधित बालक हे निश्चितच सजग नागरिक बनेल, असा विश्वास संविधानाचे अभ्यासक डॉ. ह. नि. सोनकांबळे यांनी व्यक्त केला.
यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंच जिल्हा केंद्रातर्फे एमजीएम संस्थेतील आईन्स्टाईन सभागृहात "शालेय शिक्षण आणि भारतीय संविधान" या विषयावर गुरुवारी विशेष व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर होते. यावेळी व्यासपीठावर वैशाली बावस्कर, सुबोध जाधव, डॉ. रुपेश मोरे यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. सोनकांबळे म्हणाले, शालेय वयात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भारतीय संविधानाचे मूल्य रुजविणे आवश्यक आहे. हे काम शाळा, शिक्षकच प्रभावीपणे करू शकतात. तसेच शाळांमध्ये संविधान फलक हा उपक्रम राबविल्यास त्या फलकावर विद्यार्थी त्यांच्या शब्दात केलेल लेखन प्रसिद्ध करून इतर विद्यार्थ्यांनाही वाचनासाठी उपलब्ध करून देता येईल, असेही त्यांनी सांगितले. विनोद सिनकर म्हणाले, भाषेचे शिक्षक विद्यार्थ्यांकडून शुद्धलेखन उपक्रम घेतात. त्यात भारतीय संविधानाचे कलमे, नियम यांचे लेखन विद्यार्थ्यांकडून करून घेता येईल असे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक विजय पाटोदी यांनी दृकश्राव्य माध्यमातून संविधान सभा,कायदे मंडळ यांची रचना समजावून दिली. अध्यक्षीय समारोपात रमेश ठाकुर यांनी जगातील कोणत्याही समस्येचे मूळ हे शालेय शिक्षणात सापडते असे सांगितले. डॉ. रुपेश मोरे यांनी प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले. आभार वैशाली बावस्कर यांनी मानले. यावेळी राजेंद्र वाळके, डॉ. प्रकाश खेत्री, नारायण लवांडे, बद्रीनाथ थोरात, रोहिणी माळी आदींसह मुख्याध्यापक, शिक्षकांची उपस्थिती होती.