औरंगाबाद : केंद्र आणि राज्य शासनाकडून मुबलक प्रमाणात लसच उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी शहरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच लस देण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी लस उपलब्ध नाही. रविवारी महापालिकेने एक वाहन पुण्याला लस आणण्यासाठी पाठविले. किती लस प्राप्त होतील यावरून पुढील नियोजन ठरविण्यात येणार आहे.
लसीच्या तुटवड्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची मोहीम बंद पडली आहे. औरंगाबाद महापालिकेने मेगा लसीकरण मोहीम सुरू केली होती. त्यासाठी प्रत्येक वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. दर आठवड्याला एक लाख लसची मागणी शासनाकडे करण्यात आली, पण शासनाकडून २५ ते ३० हजार लसींचाच पुरवठा करण्यात येऊ लागला, त्यामुळे लसीकरण केंद्रांमध्ये कपात करून मर्यादित स्वरूपात ही मोहीम सध्या राबविली जात आहे.
सोमवारी केल्या जाणाऱ्या लसीकरणाबद्दल माहिती देताना पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, १८ ते ४४ या वयोगटासाठी लस पालिकेकडे शिल्लक आहे. त्यात कोविशिल्ड लसीच्या डोसची संख्या १५०० असून, कोव्हॅक्सिन लसच्या डोसची संख्या ३९०० आहे. सादातनगर, मुकुंदवाडी आणि चेतनानगर या तीन केंद्रांवर लसीकरण सुरू राहील. ४५ ते ६० या वयोगटासाठी पालिकेकडे सध्या लसीचा साठा उपलब्ध नाही. साठा आणण्यासाठी वाहन पुण्याला पाठविले आहे. रात्री उशिरा प्राप्त झालेल्या साठ्याबद्दल माहिती प्राप्त होईल, त्यानंतर ज्येष्ठांच्या लसीकरणाचे नियोजन केले जाईल.