जालना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत पाच सर्कलवरुन सुरू असलेले मतभेद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. जागा वाटपावर एकमत होऊन सोमवारी आघाडीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपा स्वबळावर लढत आहेत. मतविभाजनाचा फटका या दोन्ही पक्षांना बसण्याची चिन्हे आहेत. सुरुवातीला युती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात युती तुटल्याचे जाहीर केले. त्यानंतर जिल्ह्यातही भाजपा आणि शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याबाबत बैठकांचे सत्र सुरु झाले. नेहमीप्रमाणे जागा वाटपावर मतभिन्नता दिसून आली. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ४० जागांवर लढणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. राजेश टोपे यांनी सांगितले. तर काँग्रेसचा जनाधार वाढला असून, ग्रामीण भागात काँग्रेससाठी पूरक वातावरण असून, पूर्वीपेक्षा जागा वाढवून द्याव्यात, अशी भूमिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया आणि माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी घेतली. गत आठवडाभरापासून केवळ चर्चाच सुरु असल्याने यावर निर्णय होऊ शकलेला नाही. युती तुटल्याचे कळताच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी करण्यावर भर दिला आहे. मतविभाजन होणे दोन्ही पक्षांना परवडणारे नाही, त्यामुळे काँग्रेसने दोन पाऊले पुढे यावे आणि आम्हीही दोन पाऊले मागे येऊ, असा आग्रह आ. राजेश टोपे यांनी धरला आहे. तर आघाडीबाबत काँग्रेस सकारात्मक असून, कार्यकर्त्यांनाही न्याय देण्याच्या दृष्टिने पूर्वीपेक्षा जागा वाढवून द्याव्यात, अशी आग्रही मागणी माजी आ. जेथलिया यांनी केली आहे. घनसांवगी, बदनापूर, भोकरदन आणि जालना या तालुक्यांतील काही जागांबाबत मतभेद आहेत. यावरच लवकरच तोडगा काढला जाईल. तसेच आघाडीवर उद्या शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
आज आघाडीवर शिक्कामोर्तब
By admin | Published: January 30, 2017 12:04 AM