लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात पहिल्या टप्प्यात विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या रस्त्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी दुपारी १ वाजता महावीर चौक येथे करण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.खा. दानवे म्हणाले की, शहरातील अंतर्गत जलवाहिनीसाठी दीडशे कोटी रुपये, भूमिगत गटार योजनेसाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणल्यानंतर आता शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात सभागृह उभारणीसाठी १० तर शहरातील सिमेंट रस्त्यांसाठी पुन्हा १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे. मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी जालना जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. शहरातील वृंदावन सभागृहात दुपारी १ वाजता मुख्यमंत्री शहरातील व्यापारी, उद्योजक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधतील. गतवर्षी विकास परिषद घेऊन त्यात नागरिकांनी केलेल्या सूचनांनुसार बहुतांश विकासकामे प्रस्तावित आहेत. त्यानंतर ७ आॅक्टोबर रोजी पुन्हा बैठक घेऊन नागरिकांशी चर्चा केली. त्यांनी केलेल्या सूचनांची टिपणी तयार केली असून, ती मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे खा. दानवे म्हणाले. दरम्यान, महावीर चौकात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शहरातील रस्ते काँक्रिटीकरणाचे लोकार्पण केले जाणार असून, याप्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित केल्याचे खा. दानवे यांनी सांगितले. त्यानंतर जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव व देळेगव्हाण येथील गटशेतीची पाहणी करणार आहेत. देळेगव्हाण येथील जयभवानी विद्यामंदिर येथे दुपारी २ वाजता येथे जलयुक्त शिवारमधून झालेल्या जलसाठ्याचे पूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. दानवे यांनी देळगव्हाण येथे होणा-या कार्यक्रमस्थळाची पाहणीही केली.
आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रस्ते काँक्रिटीकरणाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:48 AM