लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी व गौरी लंकेश यांना समर्पित व सीटू महाराष्टÑ आयोजित पहिल्या श्रमिक साहित्य संमेलनास रविवारी सुरुवात होत आहे. या दोन दिवसीय संमेलनात विविध कार्यक्रम, उपक्रमांचा समावेश आहे.अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत डहाके, ज्येष्ठ कादंबरीकार दीनानाथ मनोहर, ज्येष्ठ पत्रकार व लेखक महावीर जोंधळे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी ३ ते ५ दरम्यान ‘कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य : सद्यस्थिती’ या विषयावर प्रसिध्द विचारवंत व पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद तर सायंकाळी ५.३० ते ८.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ८.३० वाजता ज्येष्ठ साहित्यिका रेखा बैजल यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे.सोमवारी सकाळी ९.३० ते ११.३० वाजता ‘श्रमिकांचे मुक्ती लढे आणि मराठी साहित्य’ या विषयावर कादंबरीकार व चित्रपट कथाकार कुमार अनिल यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. सकाळी ११.३० ते दुपारी १.३० दरम्यान ‘ग्रामीण कष्टकरी आणि कला-साहित्य’ या विषयावर कवी व समीक्षक डॉ. मनोहर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. दुपारी २.३० वाजता ‘श्रमिक संस्कृतीपुढील आव्हाने’ या विचारमंथन सत्राने संमेलनाचा समारोप होईल. यावेळी सीटूचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड हे अध्यक्षस्थानी तर ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, लेखक व विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक उत्तम कांबळे, शेतमजूर युनियनचे संस्थापक कुमार शिराळकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक किशोर घोरपडे, ज्येष्ठ उर्दू शायर शम्स् जालनवी यांचा गौरव केला जाईल.संमेलनास श्रमिक, कष्टकरी जनता तसेच परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संमेलनाचे संयोजक सचिव कॉ. अण्णा सावंत, स्वागताध्यक्ष साईनाथ पवार आदींनी केले आहे.
आजपासून राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:44 AM