औरंगाबाद : खंडपीठात दिलेल्या शपथपत्रानुसार महापालिका सोमवारपासून खाजगी कंपनीकडून कचरा संकलनाचे काम करून घेणार आहे. पहाटे ५.३० वाजेपासून झोन २, ७ आणि ९ मध्ये कामाला सुरुवात होईल. महावीर चौक ते सिडको बसस्थानकापर्यंत तीन मोठे झोन आहेत. प्रत्येक नागरिकाच्या घरातून कचरा संकलन करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठरविले आहे. अत्यंत मायक्रो प्लॅनिंग करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
महापालिकेच्या एका झोनमध्ये साधारण १४ ते १५ वॉर्ड आहेत. झोन क्रमांक २ मोंढा अंतर्गत येणाऱ्या सर्व वॉर्डांमध्ये आजपासून डोअर टू डोअर कलेक्शनला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे झोन क्रमांक ७ मालखरे अपार्टमेंट अंतर्गत येणाºया वॉर्डांमध्ये कचरा संकलनाची वाहने तैनात करण्यात आली आहेत. झोन क्रमांक ९ म्हणजेच क्रांतीचौकअंतर्गत येणारे सर्व वॉर्ड खाजगी कंपनीकडे सोपविण्यात आले. एका झोन कार्यालयांतर्गत येणाºया वॉर्डांसाठी किमान ३० रिक्षा तैनात करण्यात आल्या आहेत. मोठ्या पाच गाड्याही दिल्या आहेत. पहाटे ५.३० वाजता सर्व कचºयाची वाहने आपापल्या वॉर्डांमध्ये कचरा संकलनास सुरुवात करणार आहेत. पहिल्या दिवशी किमान ४५ वॉर्डांमधील कचरा संकलन करण्याचे मोठे आव्हान कंपनीसमोर आहे.