लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील अनेक वसाहतींमध्ये भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. पाण्यासाठी दररोज नगरसेवकांना टाकीवर जाऊन बसावे लागते. एक दिवसही दुर्लक्ष केल्यास वॉर्डात पाण्याची ओरड होते. प्रशासनाने पाणीपुरवठ्यात ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी सोमवारी सकाळी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात येणार आहे.दरवर्षी उन्हाळा सुरू झाल्यावर शहरात पाणीपुरवठ्याची प्रचंड ओरड सुरू होते. सध्या तापमान ३८ ते ४० अंशांपर्यंत आहे. तापमानात अधिक वाढ झाल्यानंतर पाण्याची मागणीही तेवढीच होणार आहे. मनपाकडे वाढीव पाणी देण्याची कोणतीच तरतूद नाही. एमआयडीसीकडून ५ एमएलडी पाणी घेण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. एमआयडीसीचे पाणी मिळाल्यावर सिडको-हडकोतील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. उन्हाळा संपल्यावर एमआयडीसीचे पाणी शहरात आणणार का? असा प्रश्नही नागरिक उपस्थित करीत आहेत. उन्हाळ्यापूर्वीच महापालिकेने याचे नियोजन का केले नाही? तहान लागल्यावरच विहीर खोदण्याची महापालिकेची जुनी सवय आहे.शहरातील विविध वसाहतींमध्ये गॅस्ट्रोसदृश आजारांनी हात-पाय पसरले आहेत. दूषित पाणीपुरवठा ठिकठिकाणी होत आहे. याकडे प्रशासन गांभीर्याने विचार करायला तयार नाही. सोमवारी सकाळी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक पाणी प्रश्नावर जोरदार ओरड करणार आहेत. सिडको-हडकोतील नगरसेवकांना मागील काही दिवसांपासून बराच त्रास सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यात त्रस्त नगरसेवकांनी तर सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर जोरदार आंदोलन केले. त्यानंतर आयुक्तांनी प्रत्येक वसाहतीला चौथ्या दिवशी पाणी द्या, असे आदेश दिले.
आज सर्वसाधारण सभा; पाणी प्रश्न पेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 1:28 AM