औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील नवीन रूपडे लाभलेल्या व हिरवा गालिचा असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानाचा उद्या, शनिवारी लोकार्पण सोहळा होत आहे.हा लोकार्पण सोहळा सकाळी ९.३0 वाजता खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते होत आहे. अध्यक्षस्थानी महापौर नंदकुमार घोडेले असणार आहेत. आ. अतुल सावे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.या प्रसंगी उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, सभागृहनेता विकास जैन, विरोधी पक्षनेता खान फेरोज मोईनुद्दीन, सभापती सुरेखा सानप, आशा भालेराव, मकरंद कुलकर्णी, भाऊसाहेब जगताप, प्रमोद राठोड, सिद्दीकी नासेर तकीउद्दीन, गोकुळसिंग मलके यांच्यासह मनपा आयुक्त नवल किशोर राम, नगरसेवक राजू शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस. डी. पानझडे, प्रकल्प समन्वयक अफसर सिद्दीकी, कार्यकारी अभियंता डॉ. डी. पी. कुलकर्णी उपस्थित असणार आहेत. त्याआधी मुंबई येथील क्युरेटर नदीम मेमन यांनी ४ महिन्यांआधीपासूनच आंतरराष्ट्रीय दर्जाचे गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदान तयार केले होते; परंतु तांत्रिक अडचण आणि उद्घाटनामुळे हे मैदान क्रिकेटपटूंसाठी उपलब्ध होऊ शकले नव्हते. त्यामुळेच बीसीसीआयची १९ वर्षांखालील महिलांची पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेची येथे होणारी लढत स्थलांतरित झाली होती. विशेष म्हणजे एमसीएचे सचिव रियाज बागवान यांनीही या मैदानची प्रशंसा केली होती.या विषयाला ‘लोकमत’ने २० नोव्हेंबर रोजी वाचा फोडली होती. या वेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनीदेखील सकारात्मक पाऊल उचलताना या अद्ययावत क्रिकेट मैदानाचा लोकार्पण सोहळा लवकरच होणार असल्याचे संकेत लोकमतशी बोलताना दिले होते आणि त्यांच्या पुढाकारामुळे उद्या, शनिवारी या क्रिकेट मैदानाचा लोकार्पण सोहळा होत आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंसाठीदेखील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मैदानावर खेळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
मनपाच्या नवीन रुपडे लाभलेल्या क्रिकेट मैदानाचे आज लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:23 AM