लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : बालकांमध्ये आढळणारा दीर्घकालीन ‘कृमीदोष’ हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच, शिवाय बालकांची बौध्दीक व शारिरीक वाढ खुंटण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर १८ आॅगस्ट रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.१८ आॅगस्ट राष्टÑीय जंतनाशक दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी १ ते ६ वयोगटातील सर्व बालकांना जंतनाशकच्या गोळ्या दिल्या जाणार आहेत. तसेच ६ ते १९ वयोगटातील शाळेत जाणारे व शाळाबाह्य मुलांना गोळ्या देण्याचे उदिष्ट आहे. १८ आॅगस्ट रोजी जी मुले शाळेत किंवा अंगणवाडीमध्ये गैरजहर असतील या बालकांना (मॉपअप दिन) २३ आॅगस्ट रोजी गोळ्या दिल्या जाणार आहेत. अशी माहिती बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम यांनी दिली.त्यामुळे पालकांनी १८ आॅगस्ट रोजी पाल्यांना शाळेत व अंगणवाडीमध्ये आवश्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलांना जंतनाशक गोळी घरी घेऊन जाण्यास मनाई आहे. संबधित आरोग्य विभागाचे कर्मचारी अथवा अंगणवाडीमध्येच गोळी द्यावी, शिवाय केंद्रस्तरावर गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संबधित आरोग्यसेवक, सेविका व आरोग्य सहाय्यकांनी प्रत्येक शाळा व अंगणवाडी केंद्रास भेट देणे आवश्यक आहे. मुलांच्या आतड्यातील संसर्ग कमी करण्यासाठी जंतनाशक गोळी दिली जाते. १ ते २ वर्ष वयोगटातील मुलांना ‘अल्बेंडाझोल’ गोळीची अर्धी गोळी २०० मीलीग्रॅम तर २ ते १९ वयोगटातील मुलांना ४०० मलीग्रॅमची एक गोळी, लहान मुलांना गोळीचे चूर्ण करून पाण्यात विरघळवून देण्यात येणार आहे.
आज राष्टÑीय जंतनाशक दिन;पालकांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 11:22 PM