औरंगाबाद : जिल्हा प्रशासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या दोन प्रशासकीय यंत्रणांच्या असमन्वयामुळे पदवी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलावी लागली. याचा मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. ५ जून रोजी यूपीएससीची परीक्षा असल्यामुळे विद्यापीठाने ४ जून रोजीची नियोजित पदवी परीक्षेच्या सर्व अभ्यासक्रमांचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
यासंदर्भात पालक आणि परीक्षार्थींनी आरोप केला आहे की, यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पूर्वनियोजित होती. या परीक्षेची तारीखही पूर्वीच जाहीर झालेली होती. त्यात विद्यापीठाने पदवी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार ४ जून रोजी चारही जिल्ह्यांतील २२५ केंद्रांवर परीक्षा होणार होती. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने यूपीएससीच्या परीक्षेसाठी ४ जून रोजी काही महाविद्यालये ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यापीठ खडबडून जागे झाले आणि ऐनवेळी ४ जून रोजी होणारे पदवी परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करतेवेळी यूपीएससी परीक्षेची तारीख लक्षात घ्यायला हवी. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनानेही विद्यापीठाला यासंबंधी पूर्वकल्पना द्यायला हवी होती. असे झाले असते तर विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला नसता.
यूपीएससीची रविवारी (दि. ५) सकाळी ९.३० ते ११.३० वाजेेपर्यंत व दुपारी २.३० ते ४.३० वाजेपर्यंत, अशा दोन सत्रात शहरातील ३३ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. एकूण १० हजार ५१० परीक्षार्थींनी नोंदणी केली असून, परीक्षेसाठी एकूण १ हजार ५५२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यूपीएससीची परीक्षा असल्याने ४ जून रोजी परीक्षा केंद्र ताब्यात घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.