छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांच्या उद्या दि. १४ नोव्हेंबरला शहरात व जिल्ह्यात जाहीर सभा होत आहे. उध्दव ठाकरे यांच्या कन्नड व छत्रपती संभाजीनगरात आणि अंजली आंबेडकर यांच्या दिवसभरात सहा सभा होतील. शहरासाठी व जिल्ह्यासाठी प्रचारातील सर्वांत 'हाॅट डे' गुरुवार ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वा.चिकलठाणा एमआयडीसीतील ग्रॅहमफर्थ मैदानावर जाहीर सभा होत आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील १४ मतदार संघांसाठी ही सभा होत आहे. सभेसाठी ६० हजार चौरस फुटांचा मंडप उभारण्यात येत आहे तर अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पाच हजार वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून गुरुवारी दुपारी १२ ते ४ यावेळेत जळगाव टी पॉंइंट ते केम्ब्रिज चौक बंद राहणार आहे.
शिवसेना उद्धव सेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा गुरुवारी दुपारी ३ वा. कन्नड येथे होणार आहे. तर छत्रपती संभाजीनगरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी सात वाजता जाहीर सभा होत आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले असून ही सभा रेकॉर्डब्रेक व्हावी यासाठी शिवसैनिक परिश्रम घेत आहेत. या सभेसाठी उबाठाचे कोणकोणते स्टार प्रचारक येणार आहेत, हे कळू शकलेले नाही. १४ नोव्हेंबरलाच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांच्या सहा प्रचार सभा होणार आहेत. त्या अशा:सकाळी ११ वा. आंबेडकरनगर येथे अफसरखान यांच्या प्रचारार्थ, दुपारी १२ वा. नंदनवन कॉलनीत जावेद कुरेशी यांच्या, दुपारी १ वा. वडगाव कोल्हाटी येथे अंजन साळवे यांच्या, सायं. ५-३० वा. लासूर स्टेशन येथे अनिल चंडालिया यांच्या,सायं. ७ वा. खंडाळा येथे किशोर राजूरकर यांच्या व रात्री ८-३० वा.करंजखेडा येथे अयाज शहा यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.