औरंगाबाद : जवळपास दीड महिना ओसाड वाटणारा शाळांचा परिसर चिमुकल्यांच्या किलबिलाटामुळे उद्यापासून फुलून निघेल. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्यांनंतर उद्या बुधवारपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक, मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. रविवारपासूनच जिल्हा परिषदेचे गुरुजी शाळांची साफसफाई करण्यापासून ते नवागतांच्या स्वागताच्या पूर्वतयारीमध्ये व्यस्त आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय परिसर प्रसन्न वाटावा म्हणून अनेक शाळांमधून सजावट करण्यात आली आहे. यंदा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा शंभर टक्के प्रगत करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार त्यांनी स्वत: खुलताबाद तालुक्यातील आदर्श ग्राम असलेल्या ताजनापूर येथील जि.प. शाळा दत्तक घेतली असून उद्या ते या गावात सकाळपासून दुपारपर्यंत थांबणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी जवळपास ७२४ अधिकारी विविध शाळांमध्ये नवागतांचे स्वागत करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. ‘सीईओ’पासून केंद्रप्रमुखापर्यंत सर्वजण शाळेच्या पहिल्या दिवशी नेमून दिलेल्या शाळांवर सकाळीच जातील. शाळेत परिपाठ घेणे, पाठ घेणे, शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेणे, शाळा विकास आराखडा तयार करणे, फूल देऊन नवागतांचे स्वागत करणे, शक्य असेल तेथे गावातून वाजत गाजत मिरवणूक काढणे, शालेय पोषण आहारामध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड पदार्थ देणे आदी कामांत सहभाग घेतील. या अधिकाऱ्यांना पालक अधिकारी संबोधले जाणार असून ते प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दत्तक शाळांवर जातील. हे पालक अधिकारी गणवेश वाटप, पुस्तके वाटप कार्यक्रमातही सहभाग घेतील. पालक अधिकाऱ्यांना सूचनाशिक्षणाधिकारी आर. एस. मोगल म्हणाले की, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी यांच्या आदेशानुसार जि.प., पं.स. अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे जि.प. शाळा दत्तक देण्यात आल्या आहेत. दत्तक घेतलेल्या शाळांवर उद्या सकाळीच हजर होण्यासाठी सर्व पालक अधिकाऱ्यांना अलर्ट करण्यात आले आहे. जवळपास साडेसहा कोटी रुपयांची पाठ्यपुस्तके शाळास्तरावर पोहोच झाली आहेत. याशिवाय ६ कोटी १८ लाख रुपये गणवेशासाठी शाळांना वितरित करण्यात आलेले आहेत. आपण स्वत: वाळूजलगतच्या शाळेत हजर राहणार आहे.बुधवारपासून शाळा सुरू होत असल्याने गेल्या आठवड्यात पालक आणि विद्यार्थ्यांची शालेय साहित्याच्या खरेदीसाठी धांदल उडाली होती. जिल्ह्यातील मराठी शाळांमध्ये तसेच काही अनुदानित शाळांमध्ये पाठ्यपुस्तके मोफत दिली जात असली तरी व्यवसायमाला, वह्या, पेन, पेन्सिल, स्कूल बॅग, वॉटर बॅग, रंगपेटी, कंपास, अभ्यासक्रमाची पुस्तके आदी साहित्याच्या खरेदीवर विशेष भर दिसत होता.
आजपासून किलबिलाट
By admin | Published: June 14, 2016 11:33 PM