सिल्लोड: शेतात काम करत असताना आग्या मोहोळच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचा १० दिवसांनंतर उपचारादरम्यान शुक्रवारी ( दि. ३१) मृत्यू झाला. रुद्र शेषराव शिंदे (५ रा.धावडा) असे मृत मुलाचे नाव आहे. हा हल्ला २१ मार्च रोजी धावडा येथे झाला होता.
२१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता शांताबाई शेषराव शिंदे ( ४० ) या आपला मुलगा रुद्रला सोबत घेऊन धावडा येथील एका शेतात मजुरीचे काम करत होत्या. कापूस वेचत असताना अचानक झाडातून बाहेर आलेल्या आग्या मोहोळाच्या माश्यांनी शांताबाई आणि रुद्रवर हल्ला केला. गंभीर जखमी आई आणि मुलास सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दोघांवर अधिक उपचार सुरु होते. दरम्यान, शांताबाई यांची प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. मात्र, ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता रुद्रचा मृत्यू झाला.
गतिमंद आई-वडिलांचा एकमेव आधारशांताबाई आणि त्यांचे पती गतिमंद आहेत. लग्नाच्या १५ वर्षानंतर रुद्रचा जन्म झाला होता. तोच त्यांचा एकमेव आधार होता. त्याच्या मृत्यूने हतबल आई-वडिलांचा आधार हिरावला गेला आहे. रुद्रच्या मृत्यूचा मोठा धक्का त्याच्या आईवडिलांना बसल्याची माहिती आत्या मीराबाई सोनवणे यांनी दिली. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी १ एप्रिल रोजी दुपारी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे.