जालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगर पालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. झोपडपट्टी तसेच ज्या ठिकाणी नागरिक उघड्यावर बसतात अशा ठिकाणी नगर पालिकेचे पथक जागेवर जाऊन सर्व्हेक्षण करून अनुदानाचा धनादेश संबंधिताला देणार आहे. यासाठी नगर पालिकेने चार पथकांची स्थापना केली आहे. यासोबतच शौचालय कामांचाही आढावा घेण्यात येणार आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत जालना नगर पालिकेला १३ हजार २०० शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट आहे. मात्र अनुदान देऊनही अनेक नागरिकांनी शौचालयांची कामे सुरू केली नाहीत. अथवा ती थांबविली आहे. अशा लाभार्थींसाठी तसेच उघड्यावर शौचास जाणाऱ्या भागात नगर पालिका विशेष पथकाकडून अर्ज भरून घेणे, सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर तात्काळ अनुदान जागेवरच देण्यात येणार आहे. या अभियानामुळे शौचालयांच्या कामांना गती येऊन ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा नागरिकांना याचा लाभ होणार आहे. मुख्याधिकारी संतोष खांडेकर म्हणाले, पालिकास्तरावर हे विशेष अभियान राबविले जात आहे. चार पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात पाच कर्मचारी असतील. एका पथकात परिसरातील कर वसुली प्रतिनिधी, स्वच्छता निरीक्षक तसेच अन्य पालिकेचे कर्मचारी असतील. लॅपटॉप तसेच आवश्यक कागदपत्रे पथकाच्या सोबत असणार आहे. यातून संबंधित कुटुंबास तात्काळ फायदा मिळून शौचायल कामाला गती येईल असा विश्वास खांडेकर यांनी व्यक्त केला.
शौचालयाचे अनुदान पालिका जागेवरच देणार
By admin | Published: March 17, 2017 12:34 AM