छत्रपती संभाजीनगर : टोमॅटो महाग झाल्यानंतर चोहोबाजूने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पण आता २५० रुपयांवरून टोमॅटो चक्क ८० ते १०० रुपये किलोपर्यंत खाली आला आहे. ग्राहकांना हा दिलासा असला तरी दुसरीकडे लसणाने ३०० रुपयांचा दर गाठला आहे. यामुळे फोडणीला लसणाच्या महागाईचा तडका द्यावा लागत आहे. एखाद्यावेळी टोमॅटो खरेदी केले नाही तरी चालते पण फोडणीसाठी लसूण, आले, कांदा पाहिजेच आणि फोडणीशिवाय शेवटी भाजीही अळणीच. यामुळे महाग असला तरी लसणाच्या विक्रीत फरक पडलेला नाही, हे विशेष.
लसूण का महागलामागील वर्षी लसणाचे अधिक उत्पादन झाल्याने लसणाचे भाव ‘तळा’ला गेले होते. १०० रुपयाला चार किलो लसूण विकला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी लसणाकडे पाठ फिरवली. पाऊस कमी झाल्याने लसणाचे लागवड क्षेत्रही घटले आहे. परिणामी, लसूण ३०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.
दीर्घकालीन भाववाढीचा होतो परिणामकधी टोमॅटो महागतो तर कधी कांदा तर कधी लसूण महागतो तर कधी भाव गडगडतातही. हे किंमतीतील चढ-उतार आम्ही गृहित धरलेले असतात. हे काही दिवसांसाठी असते. जेव्हा ६ महिने किंवा त्यापेक्षा अधिक दिवस भाववाढ टिकून राहते, तेव्हा आम्हाला भाववाढ करायचा विचार करावा लागतो.- शिवाजी पाटील, अध्यक्ष, हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन
फोडणीशिवाय भाजी अळणीचलसणाशिवाय फोडणी शक्यच नाही आणि फोडणीशिवाय अनेक भाज्या अळणी लागतात. त्यात झणझणीतपणा येत नाही. यामुळे लसूण महाग झाला तरी खरेदी करावा लागतोच.- सुरेखा जोशी
कोणत्या लसणाचे काय भाव? (किलो)१) हायब्रीड लसूण १२० रु. - २०० रु.२) गावरान लसूण २५० रु. - ३०० रु.
लसूण आरोग्यासाठी गुणकारी१) लसणात सल्फर जास्त प्रमाणात आढळते.२) सल्फर हे त्वचारोगांवर आणि रक्त पातळ ठेवण्यावर लाभकारी ठरते.३) जास्त पौष्टिक पण कमी कॅलरीज.४) लसूण सर्दी-तापापासून रक्षण करतो.५) ब्लड प्रेशर स्थिर ठेवण्यासाठी फायदेशीर.६) लसणाने शरीरातील हाडे होतात मजबूत.