छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे पालकांनी पाठ फिरवली आहे. ३० एप्रिलपर्यंतच्या मुदतीत अवघ्या ५९ हजार ३४६ जणांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठीच्या नोंदणीला १० मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा-२००९ नुसार (आरटीई) खासगी आस्थापनांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा नियम आहे. या जागांवर गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतर त्यांच्या शुल्कांची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडून केली जाते. मात्र, यावर्षी शासनाने आरटीई शाळा आणि नोंदणीसंदर्भातील निकषांमध्ये मोठा फेरबदल केला आहे. त्यामुळे खासगी स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांचे मोफत प्रवेशाचे स्वप्न भंगणार असल्याचेच स्पष्ट होत आहे.
राज्य शासनाने खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांऐवजी सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांना प्राधान्य देण्याचे धाेरण स्वीकारले. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या नोंदणीत सुरुवातीच्या १५ दिवसांमध्ये राज्यातील आरटीई पात्र ७६ हजार ५३ शाळांमधील ८ लाख ८६ हजार ४११ जागांवर फक्त ५९ हजार ३४६ जणांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. हे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन नोंदणीला १० मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. कालावधी वाढीव दिला असला तरी नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता दुरापास्त असल्याची चिंता शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली .