औरंगाबाद : तोंडोळी (ता. पैठण) येथील शेतवस्तीवरील महिलांवर सामूहिक अत्याचार आणि दरोड्यातील ( Tondoli Rape Case ) आरोपींचा छडा लावण्यात ग्रामीण पोलिसांना ४८ तासांत यश आले. दरोडेखोरांच्या टोळीचा म्होरक्या कुख्यात प्रभू श्यामराव पवार (४९, रा. दुधड, ता. औरंगाबाद) यास अटक करण्यात आली. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली.
राज्याला हादरवून सोडणाऱ्या तोंडोळीतील अत्याचाराच्या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले. आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस अधीक्षक निमित गोयल हे दोन दिवसांपासून ठाण मांडून होते. पोलिसांच्या रेकॉर्डवरील प्रभू पवार हा तीन महिन्यांपूर्वी कारागृहातून बाहेर आला होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने स्वत:ची टोळी बनवली. त्याची टोळी शेतवस्तीवरील शेतकरी, मजुरांना टार्गेट करत होती. हे सर्व साथीदार चोरी, दरोडा, हत्या, बलात्कार सारख्या गुन्ह्यांतील आरोपी आहेत. तो गावात नसून, फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याच्यावर नजर ठेवण्यात आली.
१९ ऑक्टोबरच्या रात्री या टोळीने तोंडोळी येथे मध्यप्रदेशातून कामासाठी आलेल्या कुटुंबातील दोन महिलांवर सामूहिक अत्याचार करीत लुटमार केली होती. त्यापूर्वी प्रभूची टोळी बिडकीन परिसरात दोन दुचाकीवरून एका ठिकाणी जमा झाली. सुरुवातीला टोळीने गिधाडा शिवारात एका शेतावर लुटमार केली. तेथून लोहगावकडे जाताना एका वस्तीवर लुटमार करीत हजार रुपये आणि दुचाकी पळवली. तेथून तीन चार ठिकाणी चोरी करीत तोंडोळी येथील शेतवस्तीवर टोळी पोहोचली. तेथे लुटमार आणि महिलांवर अत्याचार केल्यानंतर दुचाकीवरून पोबारा केल्याची कबुलीही आरोपीने दिल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
असा सापडला आरोपीमहिलांवरील अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी जिल्हाभरात कोम्बिंग ऑपरेशन केले. हिस्ट्रीशिटर आरोपींचा शोध सुरू केला. प्रभू पवार हा गावातून फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथकही रवाना झाले होते. त्याला गुुरुवारीच ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच टोळीतील इतर सदस्यांची नावेही सांगितली.
दारू पिऊन अत्याचारदरोडेखोरांनी तोंडोळी येथील शेतवस्तीवर दरोडा टाकला तेव्हा कामगाराच्या घरात त्यांना दारूच्या काही बाटल्या मिळाल्या. त्यापूर्वीही दरोडेखोरांनी दारू पिलेली होती. कामगाराच्या घरात सापडलेली दारू पिऊन महिलांवर अत्याचार केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली.
८ किलोमीटरचा परिसर धुंडाळलाआरोपी प्रभू पवारने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला सोबत घेत घटनाक्रम उलगडून दाखविण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या पथकाने ८ किलोमीटरचा परिसर पायी धुंडाळला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निमित गाेयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी विशान नेहूल, सहायक निरीक्षक संतोष माने यांच्यासह बिडकीन, चिकलठाणा ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी केली.