छत्रपती संभाजीनगर : जमिनीचा मोजणी नकाशा देण्यासाठी ६० हजारांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयाचे भूमापक अधिकारी सचिन बाबुराव विठोरे (वय ३५) व किरण काळुबा नागरे (४३) हे दोघेही एसीबीच्या सापळ्यात रंगेहात अडकले. मंगळवारी रात्री ९ वाजता टीव्ही सेंटर येथील जैस्वाल हॉलसमोर हा सापळा लावण्यात आला होता. पहिले ५० हजार रुपये मिळूनही त्यांनी मोजणी झाल्यावर पुन्हा ६० हजारांची मागणी केली आणि त्यांना थेट तुरुंगवारी घडली.
३४ वर्षीय तक्रारदाराचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पिसादेवी रस्त्यावर प्लॉट खरेदी केला होता. त्याच्या मोजणी नकाशासाठी भूमापक कार्यालयात अर्ज केला होता. तेव्हा आराेपींनी 'मोजणी नकाशासाठी पैसे लागतात' असे सांगून दीड लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने शक्य नसल्याचे सांगितल्यावर तडजोडीअंती सध्यापुरते ५० हजार रुपये द्या, अशी मागणी केली. तक्रारदाराने ५० हजार रुपये दिले. आरोपींनी मोजणीदेखील केली.
मात्र, ६० हजारांची मागणी करत मोजणी होऊनही नकाशा देण्यास नकार दिला. तक्रारदाराचा संताप झाल्याने त्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. आटाेळे यांच्या सूचनेवरून निरीक्षक हनुमंत वारे, नंदकिशोर क्षीरसागर यांनी खातरजमा केली असता, लाच मागितल्याचे सिद्ध झाले. मंगळवारी आरोपींनी वारंवार तक्रारदाराला पैशांसाठी कॉल केले. रात्री ९ वाजता जैस्वाल हॉलसमाेर पैसे घेऊन बोलावले. सचिनने पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यास ताब्यात घेत सिडको पोलिस ठाण्यात नेले.