औरंगाबाद : एकाचवेळी दोन जातींचा लाभ घेत अध्यापकपदी मिळविलेली नोकरी डॉ. नागनाथ तोटावाड यांच्या आता चांगलीच अंगलट आली. विद्यापीठ व शासनाची फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने डॉ. तोटावाड यांच्या अध्यापक पदाची मान्यताच रद्द केली.
विद्यापीठाने यासंदर्भात शुक्रवार, दि. २९ एप्रिल रोजी घेतलेला हा निर्णय विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय प्रशासनाला कळविला आहे. डॉ. तोटावाड यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या आधारे ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, विवेकानंद महाविद्यालयात अध्यापक पदाची नोकरी ‘ओबीसी’ प्रवर्गातून मिळविली. यासंदर्भात रिपब्लिकन कार्यकर्ता नागराज गायकवाड यांनी आक्षेप घेत तोटावाड यांना अधिव्याखाता पदावरून निष्कासित करावे व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विद्यापीठ प्रशासन तसेच सहसंचालक कार्यालयाकडे केली होती.
डॉ. नागनाथ तोटावाड हे २९ सप्टेंबर २००३ रोजी अनुसूचित जमाती (एसटी) ‘कोया’ या जातप्रवर्गातून इंग्रजी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते विवेकानंद महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे अधिव्याख्याता पदावर २९ ऑगस्ट २००५ रोजी रुजू झाले. अधिव्याख्याताचे पद हे इतर मागास वर्गासाठी (ओबीसी) आरक्षित होते. त्यासाठी त्यांनी ‘ओबीसी’चे जातप्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रही सादर केले होते. विद्यापीठाच्या विहित निवड समितीमार्फत डॉ. तोटावाड यांची विहित केलेल्या प्रक्रियेने नियुक्ती केली होती.
दरम्यान, सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहायक कुलसचिवांनीदेखील डॉ. तोटावाड यांनी ‘कोया’ या अनुसूचित जमाती प्रवर्गातून ‘सेट’ उर्त्तीण केलेली असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास कळविले होते. त्यानुसार विद्यापीठाने पडताळणी केल्यानंतर डॉ. तोटावाड यांनी इंग्रजी विषयाच्या अध्यापक पदासाठी दोन जातींचा आधार घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार विद्यापीठाने अध्यापक पदाची मान्यता व ‘कॅश’ योजनेअंतर्गत वेळोवेळी देण्यात आलेली पदोन्नती रद्द करण्याचा निर्णय घेतला.