औरंगाबाद : टेलिव्हिजनवरील विविध वाहिन्यांवरून दाखविली जाणारी व्यसन सोडण्याची जाहिरात पाहून प्रभावित झाल्याने एकाने औषधी खरेदी केली. तिचे सेवन केल्यानंतरही व्यसन न सुटल्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकाने थेट औषधी कंपनीसह वाहिनीवर खोटी माहिती देणाऱ्या डॉक्टरविरुद्ध सिडको ठाण्यात फिर्याद नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
सिडको ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले की, हडको टीव्ही सेंटर परिसरातील शैलेश दत्तात्रय क्षीरसागर यांनी १३ फेब्रुवारी रोजी सिनेमा टीव्ही चॅनलवर व्यसन सोडण्याच्या प्रभावी औषधीची जाहिरात पाहिली. या जाहिरातीत डॉ. प्रताप चव्हाण आणि त्यांचे सहकाऱ्यांनी त्यांच्या जीवा आयुर्वेदिकद्वारे उत्पादित हेल्थ केअर पॅक महिनाभर सेवन केला तर नशामुक्त होता येते, असे सांगितले. यावेळी काही लोकांचे अनुभवही दाखविण्यात आले. हीच जाहिरात त्यांनी अनेक टीव्ही वाहिन्यांवर पाहिली.
या जाहिरातीवर विश्वास ठेवून क्षीरसागर यांनी २४ मे रोजी संबंधित कंपनीच्या मोबाईलवर संपर्क साधून औषधी खरेदीची आॅर्डर नोंदविली. २९ मे २०१९ रोजी कंपनीने त्यांना कुरिअरद्वारे औषधी पाठविली. क्षीरसागर यांनी १७४६ रुपये रोख देऊन औषधी ताब्यात घेतली. त्यांनी महिनाभर नियमित औषधी सेवन केली. मात्र, या औषधीचा कोणताही परिणाम त्यांच्या शरीरावर झाला नाही. एवढेच नव्हे, तर त्यांचे व्यसनही सुटले नाही. कंपनीने खोटी जाहिरात करून आपली फसवणूक केल्याची तक्रार क्षीरसागर यांनी औषधी कंपनीसह, विविध टीव्ही वाहिन्यांविरोधात फिर्याद नोंदविली.