लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नाफेड हमीभाव केंद्रावरील तूर खरेदीची चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेने साडेआठ हजार शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे. पीकपेऱ्यावरील नोंदीपेक्षा अधिकची तूर विक्री करणारे शेतकरी गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत.जालना, परतूर, अंबड व तीर्थपुरी येथील नाफेड केंद्रावर आतापर्यंत एक लाख ४० हजार ३०० क्विंटल तुरीचे खरेदी करण्यात आली आहे. नाफेड केंद्रावर सध्या तिसऱ्या टप्प्यातील तूर खरेदी सुरू आहे. यासाठी पूर्वी रद्द केलेली पीकपेऱ्याची अट पुन्हा लागू केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, तीन वेळेस मुदतवाढ देऊनही नाफेड केंद्राबाहेर हजारो क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. त्यामुळे ही तूर शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. जालना बाजार समितीमधील नाफेड तूर खरेदी केंद्रावर तेलंगणातील तुरीची विक्री झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तिसऱ्या टप्प्यातील तूर खरेदी सुरू करण्यापूर्वी जिल्हा पणन अधिकाऱ्यांमार्फत खरेदी केंद्राबाहेरीला तुरीचे पंचनामे करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी बाजार समितीमधील नाफेड केंद्रावरून अठराशे पोते तूर रात्रीतूनच गायब झाली. त्यामुळे नाफेड केंद्रावर झालेल्या तूर खरेदीची सखोल चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री लोणीकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत.
तूर माफियांचा शोध सुरू...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2017 12:20 AM