औरंगाबाद : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी शासनाने ‘हर घर तिरंगा’ हे अभियान हाती घेतले असून, दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान, घरोघरी, शाळा, ग्रामपंचायत तसेच सर्व शासकीय कार्यालयांवर तिरंगा ध्वज फडकावला जाणार आहे. दरम्यान, प्रशासनाने ध्वज पुरवठ्यासाठी एका संस्थेला कंत्राट दिले असून, या संस्थेने संहितेनुसार ध्वज आहेत का, याची तपासणी न करताच ग्रामीण भागात विक्रीसाठी ते वितरित केेले आहेत.
यासंदर्भात पैठण तालुक्यातील पालकांनी ‘लोकमत’कडे केलेल्या तक्रारीनुसार जि. प. शाळांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात पुरवठादार संस्थेने तिरंगा ध्वज विक्रीसाठी ठेवले आहेत. मुख्याध्यापकांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी ध्वजासाठी शिक्षकांकडे पैसे जमा केले. शिक्षकांनी ग्रामपंचायतीकडून त्यानुसार ध्वज विकत घेतले तेव्हा अनेक ध्वजांची किनार उसवलेली, दोरे निघालेले आहेत, काही ध्वजांवर अशोकचक्र मधोमध नसून एका बाजूला छापलेले आहेत, अनके ध्वज फिके, गडद, तर काहींवर डाग पडलेले, काही ध्वज वेड्यावाकड्या शिलाईचे निघाले. त्यामुळे ध्वजसंहितेचा अवमान होईल, या भीतीपोटी पाडळी, लाखेगाव, निलजगाव शाळांचे शिक्षक हवालदिल झाले असून, त्यांनी ते ध्वज ग्रामपंचायतीकडे परत केले आहेत.
१५-२० टक्के ध्वज खराबयासंदर्भात जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी सांगितले की, सूरत येथील उत्पादकांकडून प्राप्त झालेले १५ ते २० टक्के ध्वज खराब असल्याच्या तक्रारी आहेत. खराब ध्वज बदलून देण्याच्या सूचना पुरवठादाराला केल्या आहेत. देशभरातून ध्वजाला मागणी आहे आणि अतिशय कमी अवधीत ध्वजांचा पुरवठा होत असल्यामुळे, अशी परिस्थिती उद्भवली असावी.