वाळूज महानगर : लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय परित्यक्ता महिलेवर लैंगिक अत्याचार करून मुलगी जन्माला आल्यानंतर विवाहास नकार देणाऱ्या आरोपीविरुद्ध बुधवारी (दि.२९) एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.जोगेश्वरी येथील कांचन (नाव बदलले आहे) हिचे आठ वर्षांपूर्वी राजू ( मूळ रा. रेलगाव) याच्यासोबत लग्न झाले होते. पतीपासून कांचन हिला ७ व ५ वर्षांची दोन मुले आहेत. पती राजू हा कांचनच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असल्यामुळे दोघात कायम खटके उडू लागले. सततच्या भांडणाला कंटाळून कांचन दोन्ही मुलांना सोबत घेऊन माहेरी रांजणगावात वडिलांच्या घरी राहण्यास आली. कांचनच्या वडिलाचा मित्र विनोद तायडे याच्याशी दीड वर्षापूर्वी तिची ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाल्यानंतर विनोदने कांचनला पतीपासून घटस्फोट घेण्याचा तगादा लावला होता. विनोदच्या सांगण्यावरून पतीच्या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर वडिलाचे घर सोडून ती विनोदच्या घराच्या बाजूला भाड्याने घर घेऊन दोन मुलांसोबत राहू लागली. जवळच असल्याने तो सतत कांचनच्या घरी जाऊ लागला. त्यातून विनोदने तिच्यासोबत लग्नाची तयारी दर्शवून दोन्ही मुलांचा सांभाळ करण्याची थाप मारली व शारीरिक संबंध प्रस्थापित केले.त्यातून कांचन ही गर्भवती राहिली. १६ सप्टेंबरला तिने शासकीय रुग्णालयात मुलीला जन्म दिला. मुलगी जन्माला आल्यानंतर विनोद लग्नास टाळाटाळ करीत असल्यामुळे तिने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. विनोद तायडेविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भांगे तपास करीत आहेत.-------------
लग्नाचे आमिष दाखवून परित्यक्तेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:27 PM
लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय परित्यक्ता महिलेवर लैंगिक अत्याचार करून मुलगी जन्माला आल्यानंतर विवाहास नकार देणाऱ्या आरोपीविरुद्ध बुधवारी (दि.२९) एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ठळक मुद्देरांजणगावातील घटना : मुलगी जन्माला आल्यावर विवाहास नकार