छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. २००९ नंतर पक्षाने निर्णय घेतला असून, त्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्राथमिक आढावा घेतला.
लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभानिहाय पक्षबांधणी, बूथनिहाय रचना, नव्याने कराव्या लागणाऱ्या बदलांबाबत नांदगावकर यांनी चर्चा केली. बैठकीला मनसे नेते दिलीप धोत्रे, उपाध्यक्ष पाटसकर, जिल्हाप्रमुख सुमीत खांबेकर, आदींची उपस्थिती होती.
या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नांदगावकर म्हणाले, अंतरावली येथील आंदोलकांची भेट घेतली. त्यांचे मनसेप्रमुख ठाकरे यांच्या बोलणे करून दिले. शासनाने आंदोलन चिरडण्याचा केलेला प्रयत्न योग्य नाही. शासन अनेक कायदे करीत आहे. त्यामुळे आरक्षण देणे ही बाब सरकारला अवघड नाही. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून योग्य उमेदवार दिला जाईल, असेही ते म्हणाले.