औरंगाबाद : शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना आपले हक्क, अधिकार, जबाबदारी व कर्तव्ये तसेच शाळांची गुणवत्तापूर्ण, पायाभूत सुविधांसाठी लोकसहभाग महत्त्वाचा कसा आहे, याची जाणीव व्हावी, यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था तथा पूर्वीच्या ‘डायट’कडून सध्या सदस्यांसाठी आदर्शवत शाळाभेटींचा कार्यक्रम राबविला जात आहे.
जिल्ह्यातील अथवा तालुक्यांतर्गत शाळाभेटीचा कार्यक्रम आयोजित करून त्याठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीच्या प्रत्येकी सहा सदस्यांना घेऊन जाणे व परत आणण्याची जबाबदारी ही त्या-त्या गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण २ हजार ११३ शाळांच्या व्यवस्थापन समित्यांच्या १२ हजार ६७८ सदस्यांच्या शाळाभेटीचे नियोजन करण्यात आले असून, यासाठी सर्व ९ गटशिक्षणाधिकार्यांकडे ३७ लाख ९५ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आदर्श शाळाभेटीदरम्यान, त्या शाळेची गुणवत्ता, शिक्षकांची अध्यापन पद्धत, शिक्षक आणि गावकर्यांचे परस्पर संबंध, लोकसहभागातून राबविण्यात आलेले उपक्रम, दर्जेदार शाळेसाठी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, गावकर्यांचे सकारात्मक सहकार्य, विद्यार्थ्यांमध्ये नेमक्या कोणत्या बाबीमुळे शिकण्याची गोडी निर्माण झाली, आदी बाबींचे सदस्यांनी अवलोकन करावे व त्या आदर्श शाळेप्रमाणे आपल्या गावातील शाळा तयार करावी, हा यामागचा उद्देश आहे.
शाळाभेटीनंतर शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी आपल्या परिसरातील जिल्हा परिषद शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून शैक्षणिक गुणवत्तेत आपली शाळा अग्रस्थानी कशी राहील, याचे नियोजन करायचे आहे. आपल्या शाळेची पटसंख्या टिकून राहावी, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्यात समन्वयाची भूमिका राहावी, असे अपेक्षित आहे. समिती सदस्यांच्या शाळाभेटीचा अहवाल गटशिक्षणाधिकारी किंवा केंद्रप्रमुखांनी ‘डायट’च्या प्राचार्यांना सादर करायचा आहे. याशिवाय सदस्यांनी भेट दिलेल्या आदर्श शाळांनाही यासंबंधीचा अहवाल प्राचार्यांना द्यावा लागणार आहे. प्राप्त दोन्ही अहवालांतून शाळाभेटीच्या वेळी सदस्यांनी तेथील ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, पालकांसोबत साधलेल्या संवादाची तथ्यपडताळणी होणार आहे.
गटशिक्षणाधिकारीनिहाय निधी प्राप्त
तालुका शाळा सदस्य रुपयेऔरंगाबाद २५२ १,५१२ ४ लाख ४५ हजार २००गंगापूर २३८ १,४२८ ४ लाख २८ हजार ४००कन्नड ३२३ १,९३८ ५ लाख ८१ हजार ४०० खुलताबाद १०८ ६४८ १ लाख ९४ हजार ४००पैठण २५१ १,५०६ ४ लाख ५१ हजार ८००सिल्लोड ३०२ १,८१२ ५ लाख ४३ हजार ६००सोयगाव ९५ ५७० १ लाख ७१ हजारफुलंब्री १९८ १,१८८ ३ लाख ५६ हजार ४००वैजापूर ३४६ २,०७६ ६ लाख २२ हजार ८००