- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : कोरोनाच्या संकटातून आता एकेक उद्योग मुक्त होऊन नव्याने सुरुवात करू पाहत आहे; पण अजूनही पर्यटन क्षेत्र कधी खुले होणार याबाबत साशंकताच आहे.
औरंगाबादचेपर्यटन मुख्यत्वे परदेशी पर्यटकांवर आधारित असून, कोरोनामुळे निर्माण झालेली सद्य:स्थिती पाहता पुढचे अजून काही महिने तरी औरंगाबादचा पर्यटन उद्योग अंधारलेलाच असणार आहे. काही वर्षांपूर्वी विमान सुविधा, खराब रस्ते हे मुद्दे पर्यटनासाठी मारक ठरत होते. काही दिवसांपूर्वी विमान सुविधाही सुरू झाली आणि आता रस्त्याचे कामही होत आले असल्याने पर्यटन व्यावसायिकांचा उत्साह वाढलेला असतानाच कोरोनाच्या संकटाने पुन्हा एकदा पर्यटन क्षेत्राला उद्ध्वस्त करून टाकले.
मार्च ते जुलै या पाच महिन्यांत पर्यटन उद्योगाचे जवळपास ४५० कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. हॉटेल व्यावसायिक, टूर आॅपरेटर, फेरीवाले, दुकानदार, गाईड, टॅक्सीचालक असे शहर आणि परिसरातील जवळपास २० हजार लोकांचे आर्थिक उत्पन्न पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. कोरोनामुळे सगळ्यात लवकर बाधित झालेले क्षेत्र म्हणजे पर्यटन. त्यामुळे सप्टेंबर ते फेब्रुवारी हा मुख्य काळ हातातून जाणार असून, आता पुढच्या वर्षीपर्यंत तग कसा धरायचा, असा प्रश्न व्यावसायिकांसमोर उभा आहे. पर्यटन ही लोकांची गरज नसल्याने या क्षेत्रातील उद्योजकांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळालेला नाही.
८० टक्के लोकांना काम नाहीवेरूळ आणि खुलताबाद या दोन गावांतील ८५ टक्के कुटुंबांचा व्यवसाय हा पर्यटनावर आणि देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहे. त्यामुळे सध्या या दोन गावांतील बहुसंख्य लोकांची आर्थिक घडी विस्कळीत झालेली आहे.३०० पेक्षा अधिक फेरीवाले लेणी परिसरातच आहेत.६०० ते ७०० फेरीवाल्यांची संख्या घृष्णेश्वर मंदिर, खुलताबादचे मंदिर आणि इतर ठिकाणे, म्हैसमाळ यासारख्या अनेक ठिकाणी आहे.
२५ ते ३० हॉटेल्स आणि लॉज पर्यटन स्थळ असलेल्या परिसरात एकत्रित मिळून आहेत.
२५ ते ३० हॉटेल्स आणि लॉज पर्यटन स्थळ असलेल्या परिसरात एकत्रित मिळून आहेत.
५० ते ६० रेस्टॉरंटस्ची संख्याही असून, त्यांचे उत्पन्न पूर्णपणे पर्यटकांवर अवलंबून आहे.
१५० ते २०० गाड्या या हॉटेलमध्ये दिवसाकाठी थांबायच्या, तेथे आज सर्वत्र शुकशुकाट आहे.
वेगळ्या व्यवसायाच्या शोधात फेरीवाले, हार-फूल विक्रेते, हॉटेल व रेस्टॉरंटमधील कामगार आज वेगवेगळे व्यवसाय शोधून उपजीविका भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण कोरोनामुळे निर्माण झालेल्या असुरक्षितेमुळे त्यांना काम मिळण्यासही अडचण येत आहे.
आता पुढच्या वर्षीची आशाभारतामध्ये कोरोना रुग्णांच्या वाढीत महाराष्ट्र अव्वल आहे. औरंगाबादमध्ये येणारे बहुसंख्य पर्यटक हे मुंबई, पुणे यामार्गे येतात आणि दुर्दैवाने मुंबई, पुणे, औरंगाबाद या तिन्ही शहरांत कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे अजून काही महिने तरी इकडे पर्यटक फिरकतील की नाही, हाच मूळ प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधी सुरू होणार, त्यातही किती पर्यटक येणार आणि त्यातून औरंगाबादला कोण येणार, असे सगळेच प्रश्न अनुत्तरित असून, आता पुढच्या वर्षीचीच आशा आहे. -लियाकत अली, गाईड
लोकांमध्ये अजूनही भीतीअनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरी अजूनही लोकांच्या मनात खूप भीती आहे. पर्यटन ही गरज नसून लक्झरी आहे. त्यामुळे एवढे संकट असताना फिरायला जायचे कशाला, असा लोकांचा विचार आहे. परदेशी पर्यटकांचा ओघ सुरू होण्यासाठी आॅक्टोबर २०२१ उजाडेपर्यंत वाट पाहावी लागेल, असे वाटते, तसेच जोपर्यंत कोरोनाची लस तयार होऊन तिचा अपेक्षित परिणाम दिसणार नाही, तोपर्यंत भारतीय लोकही पर्यटनासाठी बाहेर पडणार नाहीत. त्यामुळे २०२० हे वर्ष पूर्णपणे पर्यटन व्यवसायासाठी मारक ठरले आहे.- जसवंतसिंग, टूर आॅपरेटर
३.३ ते ४ हजार विणकर बेरोजगारहिमरू शाल आणि पैठणी विणून कुटुंब चालविणारे ३ ते ४ हजार विणकर शहर आणि आसपासच्या परिसरात राहतात. सध्या हा व्यवसाय ९० टक्के ठप्प झाला आहे. त्यामुळे बहुसंख्य विणकर बेरोजगार झाले असून, कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा, याचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. शोरूम आणि व्यवसायामुळे अनेकांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. जोपर्यंत पर्यटनाला चालना मिळणार नाही, तोपर्यंत हा व्यवसायही उभारी घेणार नाही.- समीर अहमद खान, हिमरू शाल व्यावसायिक