औरंगाबाद: पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackrey ) यांचा पूर्वनियोजित औरंगाबाद दौरा अचानक रद्द झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. मुंबई विमानतळावर आल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्याने मंत्री आदित्य ठाकरे परत फिरल्याची माहिती आहे.
आज शहरात शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील ऑरिक सिटीच्या प्रशासकीय कार्यालयात ‘औरा ऑफ ऑरिक’ या ‘विदेशी गुंतवणूक व पर्यटन संधी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत विविध १० देशांचे वाणिज्य राजदूत सहभागी झाले. याच परिषदेत मंत्री आदित्य सहभागी होणार होते. यासोबतच जिल्ह्यात आज त्यांचे इतर पूर्वनियोजित कार्यक्रम होते. याबाबत शुक्रवारीच अधिकृत माहिती देण्यात आली होती. मात्र, अचानक मंत्री आदित्य ठाकरे मुंबई येथील विमानतळावरून माघारी फिरले. प्रकृती कारणामुळे त्यांनी दौरा रद्द केल्याची माहिती प्रशासनाने दिली. ऑरिकमधील आंतरराष्ट्रीय परिषद, शहर पाणीपुरवठा योजनेची पाहणी, वेरूळ लेणी येथील पर्यटकांसाठी सोयीसुविधांची पाहणी,असे कार्यक्रम यामुळे रद्द करण्यात आले.
असा होता अधिकृत कार्यक्रम यानुसार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे दुपारी १ वाजता विमानतळावर आगमन, १.३० वा. ऑरिक सिटी येथील आयुर्वेद उत्पादन निर्मिती प्रकल्पास भेट. २ वाजून ४० मिनिटांनी शहर पाणीपुरवठा योजनेची पाहणी, ३ वा. वेरूळ लेणी, ४ वा. वेरूळ लेणी परिसरात पर्यटकांच्या सोयी-सुविधांची पाहणी करून ६ वा. विमानाने मुंबईकडे रवाना होतील, असा अधिकृत कार्यक्रम शुक्रवारी प्राप्त झाला होता.