जिल्हाधिकारी चव्हाण यांचा निर्णय: १७ जूनपासून मुक्तपणे फिरा
औरंगाबाद : जिल्ह्यातील अजिंठा, वेरूळ लेण्यांसह औरंगाबाद लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा व इतर तिकिटांवर प्रवेश असलेली पर्यटनस्थळे १७ जूनपासून सकाळी ६ वाजेपासून खुली करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी जाहीर केला. पर्यटन स्थळे अनलाॅक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी धार्मिक स्थळे मात्र लॉकच राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी चव्हाण आणि पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
परवानगी दिलेल्या सर्व पर्यटनस्थळांवर कोरोना नियंत्रणासाठी लागू सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मागील दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गामुळे बंद करण्यात आली होती. जून महिन्यात ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्याचा कोरोना रुग्ण पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यावर निश्चित केलेल्या पाच स्तरामंध्ये औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना निर्बंध काही प्रमाणात कायम राहिले तर शहरात सर्व काही खुले करण्यात आले. ७ जूनपासून सर्व काही अनलॉक झाले. मात्र, पर्यटनस्थळे बंद होती. दोन दिवसांपूर्वी पुरातत्व विभागाने जिल्हाधिकारी चव्हाण यांना पत्रव्यवहार करून पर्यटनस्थळे खुले करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी दिवसभर सर्व यंत्रणांशी चर्चा केल्यानंतर गुरुवारपासून पर्यटकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी चव्हाण यांचे आदेश असे
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, परवानगी दिलेल्या सर्व पर्यटनस्थळांवर सकाळी आणि दुपारच्या सत्रात केवळ एकेक हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाईल. सर्व ठिकाणी कोरोना प्रतिबंधासाठीचे नियम पाळावे लागतील. सर्व धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद असतील. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक असेल.