खुलताबाद : तालुका हा धार्मिक व पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्यातील अनेकांचा उदरनिर्वाह हा
येणाऱ्या पर्यटक व भाविकांवरच असल्याने शासनाने पर्यटनस्थळे उघडली असली, तरी अद्याप धार्मिक स्थळे बंदच असल्याने अनेकांचा रोजगार अद्यापही सुरु झालेला नाही. त्यामुळे मंदिरे कधी उघडणार असा सवाल व्यापारी व दुकानदार करीत आहेत.
खुलताबाद येथील जागृत भद्रा मारुती मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. शनिवारी ही संख्या लाखापर्यंत जाते. मंदिर परिसरात नारळ, फूल, हार विक्री तसेच हॉटेल, धार्मिक साहित्य, प्रसाद, कटलरी दुकान, लॉजिंग त्याचबरोबर छोटे-मोठे विक्रेते असे दोनशेच्यावर व्यावसायिक अवलंबून आहेत. गेल्या चार महिन्यांपासून भद्रा मारुतीचे मंदिर बंद असल्याने त्यांची उपासमार होत आहे. वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर बंद असल्याने या ठिकाणी ही अशीच परिस्थिती आहे. मंदिर परिसरातील सर्व व्यवहार बंद असल्याने अनेकजणांनी इतर व्यवसाय सुरू केला आहे.
त्याचबरोबर खुलताबाद येथील विविध दर्गा, म्हैसमाळ येथील गिरिजादेवी मंदिरही बंदच असल्याने या ठिकाणी शुकशुकाट दिसत आहे. शासनाने काही दिवसांपूर्वी वेरूळची लेणी, दौलताबाद किल्ला आदी पर्यटनस्थळे उघडली असून आता धार्मिक स्थळे तात्काळ उघडण्यात यावी अशी मागणी होत आहे.
कोट...
गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे पर्यटनस्थळे व धार्मिक क्षेत्र बंद झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दुकाने जरी उघडली तरी दर्शनाला भाविक येत नाहीत, त्यामुळे व्यवहारही होत नाहीत.
दीपक बारगळ, नारळ विक्रेते.
कोट...
शासनाच्या आदेशानुसार भाविकांसाठी दर्शन बंद आहे. तरीही बाहेरून दर्शन घेण्यासाठी दररोज शेकडो भाविक येतात. बाहेरूनच दर्शन घेऊन जातात. सध्यातरी कुठल्याही भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही.
-राजेंद्र जोंधळे, जनसंपर्क अधिकारी, भद्रा मारुती संस्थान
फोटो कॅप्शन: खुलताबाद भद्रा मारुती मंदिर बंद असल्याने असा शुकशुकाट दिसत आहे.