- सुनील घोडकेखुलताबाद: खुलताबाद तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे खुलताबाद , वेरूळ परिसरातील छोटे मोठे धबधबे वाहू लागले असून जगप्रसिद्ध वेरूळ लेणीचा धबधबा परत एकदा जोरदारपणे कोसळू लागल्याने पर्यटकांची मोठी गर्दी लेणी परिसरातील हा धबधबा बघण्यासाठी होत आहे. दरम्यान, आज शनिवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असल्याने फुलमस्ता, धांड, येळगंगा नदी ही वाहू लागली आहे.
खुलताबाद परिसरात दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे डोंगरदऱ्यातील झरे, छोटे- मोठे धबधबे वाहू लागल्याने निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दौलताबाद, खुलताबाद, वेरूऴ, म्हैसमाऴ आदी ठिकाणी गर्दी करीत असल्याने पर्यटकांच्या गर्दीने पर्यटनस्थळे फुलून गेले आहेत.
वेरूऴचा धबधबा कोसळू लागलायंदा पाऊसच नसल्याने वेरूळलेणीचा धबधबा म्हणावा तसा कोसळत नव्हता. पंरतू गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेल्या पावसामुळे वेरूळ लेणी धबधबा सुरू झाला असल्याने जगप्रससिध्द लेणी पाहण्यासाठी सध्या गर्दी होत आहे. त्यातच वेरूऴलेणीचा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण असून या धबधब्यासोबत फोटोसेशन करण्यासाठी गर्दी होत आहे. तसेच म्हैसमाऴ परिसरात आज शनिवारी दुपारी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने येळगंगा नदी वाहती झाली आहे. वेरूळ लेणी धबधबा येळगंगा नदीवरच असल्याने धबधबा जोरदारपणे कोसळत आहे. म्हैसमाळ, वेरूळ, खुलताबाद, दौलताबाद परिसरात होत असलेल्या पावसात भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. या पावसामुळे परिसरातील सर्व पर्यटनस्थळे गर्दीने फुलून गेलेली आहेत.
भाविकांची तारांबळश्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी शनिवार असल्याने खुलताबाद येथील भद्रा मारूती च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असून जोरदार पडलेल्या पावसामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली. वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीरात ही दर्शनासाठी मोठी गर्दी झाली असून भाविक रांगेत दर्शन घेत आहे. श्रावण महिन्यात शनिवार रविवार वेरूळ, म्हैसमाळ, दौलताबाद , खुलताबाद आदी धार्मिक व पर्यटनस्थळ गर्दीने फुलून जात आहे. त्यामुळे वेरूळ, दौलताबाद घाटात वाहतुकीची कोंडी होत होती.