संजय तिपाले बीडरवींद्र मनोहर मदने या तरुणास मारेकऱ्यांनी अतिशय थंड डोक्याने संपविल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. हत्येपूर्वी रवींद्रसोबत आष्टीत त्यांनी ढाब्यावर जेवण केले होते. लोकेशन टाळण्यासाठी तिघांनीही स्वत:चे मोबाईल बंद ठेवले. रवींद्रचे प्रेत ईमामपूर रोडवर पुरल्यानंतर या सर्वांनी ‘जीव गेला तरी खरं कधीच सांगायचं नाही’ अशी शपथ घेतली होती. नववी, दहावी व पदवीच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या या त्रिकुटांनी केलेल्या ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ने पोलीसही हादरून गेले.विशीतील रवींद्रच्या खुनाचा आरोप असलेला दत्तात्रय अशोक जामकर व इतर दोन अल्पवयीन हे सर्व मैंदा (ता.बीड) येथील रहिवासी आहेत. दत्तात्रय बीए प्रथम वर्षात तर उर्वरित दोघे अनुक्रमे नववी व दहावीत शिकतात. तिघेही सर्वसाधारण कुटुंबातील असून रवींद्रचे मित्र आहेत. दीड महिन्यापूर्वी जामकरने रवींद्रच्या वडवणी येथील शॉपीतून मोबाईल खरेदी केला होता. मात्र, पैशाच्या देवाण- घेवाणीतून त्यांच्यात वितुष्ट आले. त्यावेळी रवींद्रने जामकरला चापट मारली होती. त्याचा बदला घेण्यासाठी जामकरने त्याच्या खुनाचा कट रचला. अहमदनगरला लग्नाला जाण्याचे निमित्त करुन ९ जानेवारी रोजी रवींद्रची कार क्र. (एमएच २० बीसी- ३२८०) भाड्याने घेतल्यानंतर या तिघांनीही बीड सोडताच आपले मोबाईल स्वीच आॅफ केले. जामखेडजवळ त्यांनी एका ढाब्यावर जेवण केले. त्यानंतर आष्टीनजीक लघुशंकेचा बहाणा करुन जामकरने कार थांबवायला सांगितली. त्याने खाली उतरून स्वत:कडील मिरचीपूड रवींद्रच्या डोळ्यात टाकली. तो वेदनेने विव्हळत असतानाच मागच्या सीटवर बसलेल्या दोघांनी दोरीने त्याचा गळा आवळला. प्रेतासह ते कारमधून बीडला परतले. मास्टर मार्इंड जामकरने स्वत: कार चालवली. पोलिसांना लोकेशन सापडू नये, यासाठी त्या सर्वांनी बीडला पोहोचेपर्यंत मोबाईल सुरु करायचा नाही असे ठरवले. मात्र, जामकरने नवगण राजुरी जवळ येताच आपला मोबाईल सुरु करुन बंद केला. इमामपूर रस्त्यावर रवींद्रच्या प्रेताची त्यांनी विल्हेवाट लावली. त्याच्या मोबाईलमधील सीम काढून कारमध्येच टाकून ते पळाले होते.
गुन्ह्यापूर्वी जेवणावर ताव; मोबाईल ठेवले ‘स्वीचआॅफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2017 10:56 PM