अविनाश मुडेगावकर अंबाजोगाईवीटभट्ट्यांच्या विषारी वायूच्या उत्सर्जनामुळे दीडशे एकरावरील रेशीम उद्योग संकटात सापडला असून, शेतजमिनीही नापीक होत आहेत. वीट भट्ट्यांमधून होणारे प्रदूषण परिसरातील शेतकऱ्यांसाठी घातक ठरू पाहत आहे.शहरालगत असलेल्या चनई येथे ८० शेतकऱ्यांनी १५० एकरावर तुतीची लागवड केली आहे. या माध्यमातून सहा वर्षांपासून रेशीम उद्योगाची निर्मिती सुरू आहे. बारामाही उत्पादन घेणाऱ्या या शेतकऱ्यांना आता वीटभट्टीच्या प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या सुरू असून, मोठ्या प्रमाणात कार्बनडाय आॅक्साईड, सल्फरडायआॅक्साईड असे विषारी वायंूचे उर्त्सजन होत आहे. याचा परिणाम रेशीम उद्योगासाठी लागणाऱ्या अळ्या व होणारी कोश निर्मिती यावर होत आहे. येथील शेतकरी प्रशांत पंडीतराव कदम यांचा दोन एकराचा प्लॉट प्रदूषणामुळे निकामी झाला असून विषारी वायूच्या उत्सर्जनामुळे आळ्या मरून पडल्या आहेत. यात त्यांचे अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. कदम यांच्याबरोबरच इतर शेतकऱ्यांच्या रेशीम उद्योगाला घरघर लागली आहे. सदरील नुकसान पाहणीसाठी औरंगाबाद येथून शास्त्रज्ञांचे पथक आले होते. त्यांनी रेशीम उद्योगाच्या शेडला भेटी दिल्या असत्या ठिकठिकाणी विषारी वायूच्या उत्सर्जनामुळे अळ्या मरून पडल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. तसा अहवालही त्यांनी वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे जिल्हा रेशीम अधिकारी वैजनाथ भांगे यांनी सांगितले.
वीटभट्ट्यांमुळे विषारी वायूचे उत्सर्जन
By admin | Published: April 01, 2017 12:12 AM