छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑरिक सिटीच्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या (डीएमआयसी) बिडकीन औद्योगिक पट्ट्यात चार मोठ्या कंपन्या तब्बल ५६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा सरकारने केली होती. या सर्व कंपन्या येथे उद्योग सुरू करण्याबाबतीत गंभीर असल्याचे दिसून येते. चारपैकी तीन कंपनीने जमिनीची संपूर्ण रक्कम ऑरिककडे जमा केली आहे.
अथरला जमिनीचा ताबा देण्यात आला असून, उर्वरित कंपन्यांनाही जमिनीचा ताबा दिला जाणार असल्याचे ऑरिकच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. शिवाय या कंपन्यांनी पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याची माहिती ऑरिककडून मिळाली. छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीच्या बिडकीन आणि शेंद्रा डीएमआयसीमध्ये १० हजार एकर जमीन आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी ऑरिकमध्ये अथर एनर्जी, टोयोटा-किर्लाेस्कर मोटार्स, लुब्रिझोल आणि जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी या कंपन्यांनी ५६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. या कंपन्यांमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, असा सुमारे १८ ते २० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. याबाबतचे सामंजस्य करार कंपन्यांचे प्रमुख आणि राज्य शासनासाेबत झाले होते.
या सर्व कंपन्यांनी त्यांचे प्रकल्प येथे उभारण्यासाठी पर्यावरण विभागासह अन्य विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविणे, जमीन ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केल्याची माहिती ऑरिक सिटीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. जमिनीची संपूर्ण किंमत ऑरिककडे भरल्यानंतर जमिनीचा अधिकृत ताबा कंपन्यांना मिळतो. यानंतर प्रकल्पाचे बांधकाम करण्यास सुरुवात केली जाते. सूत्रांनी सांगितले की, येथे गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या प्रत्यक्ष उत्पादनाला २०२६ मध्येच सुरुवात होईल.
तीन टप्प्यांत भरावे लागतात जमिनीचे पैसेमागणी केलेल्या जमिनीच्या मूल्यापैकी पहिल्या टप्प्यात ५ टक्के, एक महिन्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २० टक्के, तर तिसऱ्या टप्प्यात ७५ टक्के, अशी एकूण १०० टक्के रक्कम ऑरिक सिटीकडे जमा करावी लागते.
अथर एनर्जी कंपनीउत्पादन- इलेक्ट्रिक दुचाकीप्रकल्पासाठी घेतलेली जमीन- १०० एकरगुंतवणूक-- २ हजार कोटी.राेजगार- प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ४ हजारसद्य:स्थिती- जमिनीची १०० टक्के रक्कम भरली
टोयोटा- किर्लोस्कर मोटार्सउत्पादन- चारचाकी ईव्ही वाहन निर्मितीएकूण जमीन-- ८२७ एकरगुंतवणूक-२५ हजार कोटीरोजगार- ७ ते ८ हजारसद्य:स्थिती- जमिनीची १०० टक्के रक्कम भरली
जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटीएकूण जमीन- ६३६ एकरउत्पादन- ईव्ही कमर्शियल बस, कारगुंतवणूक-२७ हजार २०० कोटीरोजगार- ५ हजार २००सद्य:स्थिती-जमिनीची १०० टक्के रक्कम भरली
लुब्रिझोल इंडिया प्रा.लि.जमीन- १२० एकर,उत्पादन- औद्योगिक वंगणगुंतवणूक--२ हजार कोटीरोजगार-९०० ते १०००सद्य:स्थिती- जमिनीची २५ टक्के रक्कम भरली.
उत्पादन प्रक्रिया लवकरचऑरिकमध्ये प्रकल्प साकारण्यास कंपन्या उत्सुक आहेत. यामुळे दोन महिन्यांपूर्वी ऑरिकमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केलेल्या चारपैकी तीन प्रमुख कंपन्यांनी जमिनीची शंभर टक्के रक्कम भरली आहे. या कंपन्या ऑरिकमध्ये लवकरात लवकर उत्पादन प्रक्रियेत येण्यास उत्सुक आहेत.- पी. डी. मलिकनेर, व्यवस्थापकीय संचालक, ऑरिक.