उमरगा : कोणत्याही घटनेच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत येथील व्यापारी महासंघाच्या वतीने बुधवारी मोर्चा काढून पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयाच्या माध्यामातून राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे विकृतीकरण करुन त्यांचा अवमान करण्याचा प्रकार सुरु आहे. या प्रकाराचा निषेध करतानाच शहरातील मुख्य बाजारपेठ बंद करुन सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार होत आहे. शिवाय याचाच फायदा घेऊन काही गुंड प्रवृत्तीचे लोक बाजारपेठेत येऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करुन व्यापाऱ्यांना मारहाण व दगडफेक करुन जबरदस्तीने बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर वेळीच कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर महासंघाचे अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, सचिव हरिप्रसाद चंडक, उपाध्यक्ष भागवत सोनवणे, नितीन होळे, दिलीप पोतदार, बाबा कारचे, विक्रम माणिकवार, कमलाकर सुकणे, प्रा. रवि आळंगे, श्रीकांत सोमाणी, शमीम पठाण, अप्पा दंडगे, रमेश इंगळे, इस्माईल शेख आदींच्या सह्या आहेत. (वार्ताहर)
उमरग्यात व्यापाऱ्यांचा मोर्चा
By admin | Published: June 12, 2014 11:42 PM