औरंगाबाद : राज्य शासनाच्या आदेशानुसार मंगळवारी दुपारी ४ वाजल्यापासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाली. या निर्णयामुळे व्यापार कोलमडण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत व्यापाऱ्यांनी विविध संकटांचा मुकाबला केला. आता तिसऱ्या लाटेचे निर्बंध असह्य ठरत आहेत. दुपारी ४ वाजल्यानंतर ग्राहक खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल होतात. त्याचवेळी दुकाने बंद करावी लागत आहेत. दुकानांचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार, स्वत:चा घर खर्च, बँकांचे हप्ते, जीएसटी, महापालिकेचा कर भरावा कसा, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
पहिल्या लाटेत माणुसकीच्या नात्याने काही दुकान मालकांनी भाडे माफ केले. दुसऱ्या लाटेत दुकाने बंद ठेवून भाडे द्यावे लागले. आता तिसऱ्या लाटेत अर्धा दिवसच दुकान सुरू राहील. दिवसा अनेक व्यापाऱ्यांकडे ग्राहकच नसतात. सायंकाळी थोडाफार व्यवसाय होतो. त्याचवेळी दुकाने बंद करावे लागत आहेत. आणखी काही दिवस ही परिस्थिती राहिली तर व्यापारी पूर्णपणे कोलमडून जातील, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली जात होती. त्यानंतर ७ जूनला निर्बंध उठविण्यात आले. बाजारपेठ हळूहळू पूर्ववत होत होती. मात्र, आता अवघ्या २१ दिवसांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लादण्यात आले.
व्यापारी शासनाकडे दु:ख मांडणार
डेल्टा प्लसचा रुग्ण ज्या भागात सापडेल त्या भागात कडक उपाययोजना कराव्यात. अद्याप शहरात रुग्णच सापडलेला नाही. कोरोना रुग्णसंख्याही बरीच अटोक्यात आहे. व्यापारी नियमांचे पालन करूनच व्यवसाय करीत आहेत. व्यापाऱ्यांची आर्थिक अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यात आले. लवकरच मुख्यमंत्र्यांकडेही दु:ख मांडण्यात येईल. तेथूनच थोडासा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ.
हॉटेल उद्योग पूर्णपणे उद्ध्वस्त
हॉटेलला ग्राहक सायंकाळीच सर्वाधिक येतात. दुपारी जेवणासाठी येणारे ग्राहक अत्यंत कमी असतात. सायंकाळी हॉटेलच बंद म्हणजे कसे शक्य आहे. पार्सल घेण्यासाठी ग्राहक येत नाहीत. नवीन निर्बंध हॉटेल व्यवसायाला बुडविणारे आहेत. अगोदरच दोन लाटांमध्ये हॉटेल व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या खचला आहे. आता तिसऱ्या लाटेत तग धरणे कठीण आहे. हा व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय नाही. दुसरा व्यवसाय निवडावा लागेल.
किशोर शेट्टी, हॉटेल व्यावसायिक
चार तास थांबलो, पण उपयोग नाही...
गोमटेश मार्केट भागात अनेक वर्षांपासून भेळ विकतो. नवीन नियमानुसार आज १ वाजताच गाडी लावली. ४ वाजेपर्यंत शंभर रुपयांचाही व्यवसाय झाला नाही. भेळ खाणारा ग्राहक दुपारी ४ नंतरच येतो. चार तास गाडी लावून काहीच उपयोग झाला नाही. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास उपासमार होईल. शासनाने याचा कुठे तरी गांभीर्याने विचार करावा.
सुरेश कन्हैयालाल तेली, भेळ विक्रेता.