औरंगाबाद : जिल्हा व्यापारी महासंघाने ५ वर्षांपूर्वी महानगरपालिकेत ‘मागणीनामा’ प्रसिद्ध केला होता. त्यात मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हॉकर्स झोन तयार करावेत, कोणतीही करवाढ करताना नागरिकांना, व्यापाऱ्यांना विश्वासात घ्यावे, या मागण्यांचा समावेश होता. मात्र, विजयी झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. मागील पाच वर्षांच्या कारभाराला १० पैकी ५ गुण व्यापाऱ्यांनी दिले आहेत.
निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवार आपले जाहीरनामे जाहीर करीत असतात. मात्र, जिल्हा व्यापारी महासंघाने २०१५ च्या मनपा निवडणुकीत ‘मागणीनामा’ जाहीर केला होता. निवडून येणारे उमेदवार व सत्ताधाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा होती. मात्र, पाच वर्षांत मनपा कारभाऱ्यांना हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लावता आला नाही, असे महासंघाचे सचिव लक्ष्मीनारायण राठी यांनी सांगितले.
अजूनही हॉकर्स झोनसाठी आम्हाला महानगरपालिकेच्या खेट्या माराव्या लागत आहेत. दुकानासमोर लागणाऱ्या हातगाड्यांची संख्या मागील पाच वर्षांत २० ते २५ टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे वाहतूकजामची समस्या निर्माण झाली. कोंडीला कंटाळून शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत आता ग्राहक येणे टाळू लागले आहेत. याचा परिणाम व्यवसायावर झाला असून, पाच वर्षांत ५० टक्क्यांनी धंदा घटल्याचेही त्यांनी सांगितले. अजूनही शहरातील काही भागात रस्ता रुंदीकरण झाले नाही. जेथे रस्ता रुंदीकरण झाले तेथे हातगाडी व वाहन पार्किंगमुळे पुन्हा रस्ता अरुंद झाला. रुंदीकरण न झालेल्या भागात वाहतूकजामचा त्रास प्रचंड वाढला असून, आता शहरातील व्यापारी जालना रोड, जळगाव रोड, सिडकोत आपली दुकाने स्थलांतरित करीत आहे किंवा नवीन शाखा उघडत आहेत.
रस्त्याची कामे करताना सर्वात पहिले, जलवाहिनी, मलनिस्सारण वाहिनी टाकून नंतर रस्ता तयार करावा, अशी मागणी मागणीनाम्यात होती. त्याकडे दुर्लक्ष करून रस्ते बांधण्यात आले. त्यामुळे आता भविष्यात समस्या निर्माण होणार आहेत. याशिवाय शहरवासीयांवर कोणताही कर लावण्यापूर्वी येथील नागरिक व व्यापारी महासंघाशी चर्चा करून मगच निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती; पण या मागणीकडे स्पशेल दुर्लक्ष करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात यावे, या मागणीचाही समावेश होता. मात्र, औरंगपुरा, टीव्ही सेंटर, कॅनॉटप्लेस वगळता अन्य ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यात आले नाही. गुलमंडी, मछली खडक, सिटीचौक, पैठणगेट या परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना आजही स्वच्छतागृहासाठी औरंगपुरा जिल्हा परिषद मैदानापर्यंत जावे लागते.
ज्याठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह तयार करण्यात आले त्याची अवस्था बिकट आहे. अजूनही शहरातील बहुतांश रस्ते खड्ड्यातच आहे. जिथे सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले ते अर्धवट काम झाले आहे. मध्यंतरी संपूर्ण शहर कचरामय झाले होते. यामुळे शहराची बदनामी अमेरिकेपर्यंत झाली होती. याचाही येथील बाजारपेठेलाच नव्हे तर पर्यटन उद्योगालाही मोठा फटका बसला होता. आता कचऱ्याची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे, यामुळे आम्ही मागील ५ वर्षांतील मनपाच्या कारभाराला ५ मार्क देत आहोत.
व्यापाऱ्यांना बाजारपेठेला काय हवे - महापालिका हद्दीतील प्रत्येक बाजारपेठेत महिला,पुरुषांसाठी स्वच्छतागृह सुरू करा.- बाजारातील कचरा उचलण्यासाठी नियमित घंटागाडी पाठविण्यात यावी. - मुख्य ठिकाणी बाजाराची ओळख सांगणारे फलक लावण्यात यावेत. - ड्रेनेजलाईन तुंबल्याने अनेक रस्त्यांवरून ड्रेनेजचे पाणी वाहते त्यामुळे दुर्गंधी पसरते. ताबडतोब दुरुस्त करण्यात यावी. - हातगाड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हॉकर्स झोन सुरूकरा.- वाहतूकजामची समस्या सोडविण्यासाठी ‘पे पार्किंग’ सुरूकरा.
शहर जिवंत ठेवले हेच खूपमाझ्याच कार्यकाळात मागील निवडणुकीत व्यापारी महासंघातर्फे ‘मागणीपत्र’ तयार करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराने मागील पाच वर्षांत शहरवासीयांना मोठा फटका बसला आहे. सुविधांऐवजी असुविधाच वाढल्या आहेत. व्यापारी, नागरिक नियमित, प्रामाणिक कर भरतात; पण त्या बदल्यात काय मिळाले, समस्या आणखी वाढल्या आहेत. कचऱ्यामुळे बाजारपेठेला मोठा फटका बसला. रस्त्याचे काम चार चार महिने सुरूराहते यामुळे दुकानदारांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागतो. सहा दिवसाआड पाणी येते यामुळे शहरात स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाण घटले. मनपाच्या कारभाराला १० पैकी ४ मार्क मी देतो. -अजय शहा, माजी अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ