जालना : शासनाच्या आडत वसुली निर्णयावरून मागील १३ दिवसांपासून आडत व्यापाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र, बाजार समिती प्रशासनाने नोटिसा बजावल्याने गुरुवारी व्यापाऱ्यांनी बंद मागे घेत, व्यवहार पूर्ववत केले. गुरुवारी ८ लाख ७७ हजार ५७७ रुपयांची उलाढाल झाली. राज्य शासनाने ५ जुलै रोजी अध्यादेश जारी करून बाजार समितीत माल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीमधून कपात न करता आडत दराची रक्कम ही खरेदीदारांकडून आडतीयांनी वसूल करावी याबाबतचे निर्देश दिलेले आहेत. हा अध्यादेश मागे घेण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदचा मार्ग अवलंबिला आहे. त्यानुसार तब्बल १३ दिवस मोंढ्यातील भुसार मार्केट बंद होते. अखेर शासनाच्या निर्णयापुढे झुकून व्यापाऱ्यांना बंद मागे घ्यावा लागला. व्यवहार सुरळीत पण...जालना बाजार समितीमधील भुसार मार्केटचे व्यवहार गुरूवारपासून सुरळीत झाले असले तरी खरेदीदारांनी अल्प प्रतिसाद नोंदवला. काही दुकानदारांनीही लिलावामध्ये सहभाग नोंदविला नाही. ज्या आडत व्यापाऱ्यांनी यात भाग घेतला. त्यांनीही आपल्या दुकानांतून अत्यल्प माल बाहेर काढला. (वार्ताहर)शासनाने मार्केट कमिटीतील व्यापाऱ्यांकडून आडत वसूल न करता ती खरेदीदारांकडून वसूल करण्याचे आदेश दिलेले आहेत. शासनाने ३ टक्के आडत कपात ठरविली आहे. मात्र जालना बाजार समितीमध्ये अडीच टक्केच आडत वसुली करण्यात येत आहे. त्यात बदल केवळ आता शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून वसूल करण्यात येत असल्याचे बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांचा बंद मागे!
By admin | Published: July 22, 2016 12:24 AM