अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आषाढीहून परतणाऱ्या संतश्री गजानन महाराज यांच्या पालखीचे रविवारी बीडमध्ये आगमन होत असून स्वागतासाठी स्थानिक भाविकांनी तयारी पूर्ण केली आहे. ४५ वर्षांपासून बीडमध्ये ‘श्रीं’ना नैवेद्याची येथील विठ्ठल मंदिरात परंपरा सुरु आहे.आषाढी एकादशीनिमित्त शेगांव येथून पंढरपूर वारीसाठी गेलेल्या संत श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे पौर्णिमेपासून पंढरपुर येथून पालखी आठ दिवस मार्गक्रमण करत रविवारी बीडमध्ये येत आहे. पंढरपूर ते शेगाव असा तीन आठवड्यांचा पालखी प्रवास आहे. रविवारी सकाळी सात वाजता बीड येथील सोमेश्वर मंदिर येथे पालखी आगमनानंतर शिवाजी पुतळा येथून मिरवणुकीला प्रारंभ होईल. कारंजा रोड बलभीम चौक, धोंडीपुरा, माळीवेस, सुभाष रोड, डॉ. आंबेडकर चौक, बालाजी मंदिरमार्गे पेठेतील श्री विठ्ठल मंदिर संस्थानात नैवेद्य, आरती व नंतर कनकालेश्वर मंदिरात पालखीचा मुक्काम राहणार आहे. यंदा पालखी सोहळ्यात ७५० वारकरी असून संस्थानचे वाद्यवृंद, अश्व, ध्वजकरी, टाळकरींसह श्रींचा पालखी रथ असे यंदा आकर्षण आहे. दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन एकनाथ महाराज पुजारी आणि भक्तांनी केले आहे.
बीडमध्ये ४५ वर्षांपासून ‘श्रीं’ ना नैवेद्याची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2017 12:16 AM