औरंगाबाद : २० ते २५ वर्षांपूर्वी कामटी व कागदापासून तयार केलेले आकाश कंदिल मिळत असत. तेच आकाश कंदिल आता पुन्हा अवतरले आहेत. बाजारपेठेत फेरफटका मारताना आधुनिक डिझाईनच्या आकाश कंदिलात हे हँडमेड आकाश कंदिल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या षटकोनी व चांदणी आकारातील आकाश कंदिल पाहून अनेकांना आपले लहानपण आठवत असून लगेच ते खरेदीही केले जात आहेत.
राज्य सरकारने प्लास्टिक बंदी आणली पण बाजारात प्लास्टिकचे आकाश कंदिल विक्रीला आले आहेत. मात्र, अनेक जागरुक ग्राहक खास इकोफ्रेंडली आकाश कंदिलाची मागणी करीत आहेत. या संधीचा व्यावसायिक फायदा उचलत काही व्यापाऱ्यांनी खास जुन्या पद्धतीचे पारंपरिक आकाश कंदिल बनवून घेतले आहेत. काही महिलांनी कामटी व रंगीत कागदाचा वापर करून जुन्या पद्धतीचे आकाश कंदिल तयार केले. चांदणी व षटकोनी आकाश कंदिल बनवून ते छोट्याखानी दुकानात लटकवून ठेवले.
प्लास्टिकच्या आकाश कंदिलात हे कागदी आकाश कंदिल उठून दिसत असल्याने व २० ते २५ वर्षांपूर्वीच्या दिवाळीची आठवण करून देत असल्याने हे आकाश कंदिल सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. यंदा शहरातील काही महिलांनी प्लायवूड व चमकीचे जाळीदार कपडे व लेसचा वापर करून आधुनिक पद्धतीचे आकाश कंदिल तयार केले आहेत. त्यांना मागणी चांगली आहे. यामुळे महिलांमधील उत्साह वाढला आहे. आता पुढील वर्षी शहरातच मोठ्या प्रमाणात आकाश कंदिल तयार करण्यात येतील.
इकोफ्रेंडली आकाश कंदिलाला मुंबईतून मागणी आकाश कंदिलाच्या एका डिझायनरने सांगितले की, आपल्या शहरात मुंबईतून आकाश कंदिल आणले जातात. मात्र, यंदा कामटीच्या टोपल्या व जाळीच्या कापडापासून शहरात तयार केलेल्या इकोफ्रेंडली आकाश कंदिलास मुंबईतून मोठी मागणी आहे. जागरूक ग्राहक याच आकाश कंदिलांना पसंत करीत आहेत.