लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबादेतील ख्रिस्त बांधवांनी भक्तिभावे नाताळ सण साजरा केला. शहरातील सर्वपंथीय चर्चमध्ये या निमित्ताने विशेष प्रार्थना व ख्रिस्त जयंतीचा संदेश दिला गेला. गोरगरिबांना तसेच अनाथ आणि विधवांना वस्त्र आणि अन्नदान करण्यात आले.नाताळच्या पूर्वसंध्येला १२ वाजेपासून नाताळ सणाला सुरुवात झाली. त्यानिमित्ताने काल अनेक चर्चमध्ये मध्यरात्रीच्या प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवित्र शास्त्राआधारे येशू ख्रिस्ताच्या जन्माबाबत विशेष संदेश देण्यात आला. ठिकठिकाणी येशूच्या गव्हाणीमधील (गाईच्या गोठ्यातील) जन्माचे सजीव आणि निर्जीव देखावे तयार के ले होते आणि भव्य तारे (स्टार्स) उभारण्यात आले होते. जवळपास सर्वच चर्चवर रोषणाई करण्यात आली होती.आज शहर, छावणी आणि सिडकोतील सर्वपंथीय चर्चमध्ये आबालवृद्धांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. चर्चच्या बाहेर बालकांसाठी विविध खेळणी, फुगे, फळे तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. काही चर्चमध्ये धार्मिक पुस्तके, कॅलेंडर्स आणि विविध धार्मिक साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. दिवसभर सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते.सणानिमित्त मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांसाठी चर्चच्या बाहेर मोठमोठे पेन्डॉल लावण्यात आले होते. तेथे साउंड सिस्टीम, सीसीटीव्हीआणि स्क्रीन प्रोजेक्टरही लावण्यात आले होते. तरुणांनी भाविकांची पादत्राणे सांभाळली आणि पिण्याच्या पाण्याची आणि बैठकीची व्यवस्था केली.आज क्राईस्ट चर्चमध्ये प्रिस्ट इन्चार्ज तथा मराठवाडा धर्मप्रांताचे बिशप रा. रेव्ह. एम.यू. कसाब, सहयोगी आचार्य रेव्ह. आर. पी. राठोड आणि रेव्ह. एस.एस. बत्तीसे यांनी सेंट फिलिप चर्चमध्ये प्रिस्ट इन्चार्ज रेव्ह. एस. वाय. घुले, सहायक आचार्य रेव्ह. आर.बी. गायकवाड, रेव्ह. एस.सी. निर्मळ, रेव्ह. विलास नाडे आणि रेव्ह. डिकन अक्षय एस. घुले, होली ट्रिनिटी चर्च, नगरनाका येथे प्रिस्ट इन्चार्ज रेव्ह. डॉ. सी. एन. आठवले आणि सहायक आचार्य रेव्ह. पी. के. आकसाळ व रेव्ह. डिकन सॅम्युएल निकाळजे, सेंट स्टिफन चर्च सिडको येथे प्रिस्ट इन्चार्ज रेव्ह. डॉ. सी. एन. आठवले आणि सहायक सी.भालेराव व गुढेकर, होरेब चर्च, रामनगर येथे प्रिस्ट इन्चार्ज रेव्ह. संतोष शास्त्री आणि सहायक पास्टर पवार, गुड शेफर्ड चर्च, चिकलठाणा येथे प्रिस्ट इन्चार्ज श्याम घाडगे, तर सातारा परिसरात रेव्ह. बी. एस. रानडे यांनी भक्ती घेऊन ख्रिस्त जयंतीचा संदेश दिला.
ख्रिस्त जयंतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने प्रार्थना आणि संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:21 AM