औरंगाबाद : बीड बायपासवरील सहापदरीचे काम सुरू झाले असून, पुलांची रुंदीदेखील वाढविण्यात आल्याने आता वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बीड बायपास रोडवरील अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटनांमुळे रेंगाळून पडलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. यासाठी मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतरही प्रशासकीय यंत्रणेने हा निर्णय घेतला. रस्त्यात अडसर ठरणारी विविध बांधकामे अतिक्रमण हटाव पथकाने काढली, तर अनेक बांधकामे नागरिकांनीही काढून घेतल्याने १५ मीटर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाला मोकळा करून दिलेला आहे. त्यावर ६ मीटरच्या ६ पदरी रस्त्याचे काम सुरू करण्यात येत आहे. संग्रामनगर पुलासह देवळाई, एमआयटी पुलाचे काम ३१ मेअखेर पूर्ण करण्याची तयारी होती. पुलांवरील मुख्य काम अद्याप बाकी असून, ते काम पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लागलेली दिसत आहे. सहालाइनचे तसेच सर्व्हिस रोडचे देखील काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.
वाहतूक कोंडी सुटावी..रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली तेव्हापासून वाहनांच्या धुराळ्याने वाहनधारक व पादचारी त्रस्त आहेत. सहापदरी होत असलेल्या रस्त्याच्या कामाची गती वाढवावी, त्यामुळे वाहतूक कोंडी लवकर सुटेल.- रोहन पवार, नागरिक
पुलाचे काम झपाट्याने पूर्ण करा...पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्याची लिमिट होती; परंतु ते अद्याप झालेले नाही. वळसा घेऊन आमदार रोडवर जावे लागत आहे. पुलाचे काम त्वरित पूर्ण करून पुलाखालून रस्ता सुरू करण्याची गरज आहे. - सविता कुलकर्णी
वाहतुकीची कोंडी सुटणार...रस्त्याच्या दुतर्फा वसाहतीत वाढ झालेली असून, त्यासाठी बीड बायपास रस्ता आता सहापदरी होत आहे. त्यात सर्व्हिस रस्त्याचाही समावेश होत आहे. धुळीचा त्रास कमीच होणार असून, भविष्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे. जनतेच्या सहकार्याची गरज आहे. - सुनील कोळसे, कनिष्ठ अभियंता