वाळूज महानगर : पंढरपूरलगत शुक्रवारी (दि.१६) दुपारी ३ वाजेच्या सुमारास कंटेनर चिखलात फसल्याने जवळपास अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे ए.एस.क्लबपर्यंत वाहनाच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. क्रेनच्या सहाय्याने हा कंटेनर बाहेर काढल्यानंतर नगर रोडवरील वाहतूक सुरळीत झाली.
औरंगाबादकडून नगरच्या दिशेने कंटेनर(एन.एल.०१, एन.७९४६) चालला होता. पंढरपुरातील देवगिरी बँकेलगतच दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका गोडावूनकडे वळण घेत असताना गॅस पाईपलाईनसाठी खोदकाम केल्यानंतर मलब्याचा चिखल झाल्याने कंटेनर त्यात फसला. रस्त्याच्या मधोमध हा कंटेनर अडकल्यामुळे नगर रोडवर जवळपास अर्धा तास वाहतूक कोंडी झाली. यात ए.एस.क्लबपासून पंढरपूरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेक वाहनधारकांनी पंढरपूरच्या जामा मशिद चौक व तिरंगा चौकातून वळण घेत कामगार चौकातून मार्ग काढला. अखेर क्रेनच्या मदतीने हा चिखलात अडकलेला कंटेनर बाहेर काढल्यानंतर या मार्गावरील वाहतूक अर्धा तासाने सुरळीत झाली.
खोदकामामुळे वाहनधारक त्रस्तऔरंगाबाद-नगर रोडवर भूमिगत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम कासवगतीने सुरु आहे. वाळूज-पंढरपूरदरम्यान ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. पाईप टाकल्यानंतर मलबा व्यवस्थितपणे सपाट करण्यात न आल्याने पाऊस पडल्यानंतर या मार्गावर चिखल होत आहे. यातून अपघात व वाहतूक कोंडीसारखे प्रकार घडत आहेत.