छत्रपती संभाजीनगर : व्हीव्हीआयपी प्रोटोकॉलमुळे मंगळवारी उडालेल्या वाहतुकीच्या बोजवाऱ्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली होती. बुधवारी सायंकाळनंतर सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शहानुरमियाँ दर्गा, रोपळेकर चौक, सिडको चौकात लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह राष्ट्रीय स्तरावरील जवळपास १६ नेते शहरात हाेते. सायंकाळी ५ वाजेनंतर या व्हीव्हीआयपी दौऱ्यामुळे जालना रोडवर नागरिक वाहतूक कोंडीत अडकून पडले. बुधवारी दुपारपासून पावसाने हजेरी लावली. सायंकाळी ६ वाजेनंतर पावसाने जोर धरल्याने शहरातील बहुतांश वसाहती, रस्ते, चौकांमध्ये नेहमीप्रमाणे पाणी साचले. परिणामी, वाहतुकीवर परिणाम होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पहायला मिळाले.
नियमन करण्यासाठी कर्मचारीच नाहीसायंकाळी ७ ते ८ या वेळेत रोपळेकर चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली होती. संग्रामनगर उड्डाणपूल ते गोदावरी टी पॉईंट येथील उड्डाणपुलाच्या खालील चौकात ६ वाजेपासूनच वाहतूक ठप्प झाली. अनेकांनी बेशिस्तपणे उलट दिशेने वाहने दामटल्याने सर्वांनाच मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
सेव्हन हिल्स ते हायकोर्ट चौकहॉटेल रामा इंटरनॅशनलसमोर रस्त्याच्या अर्ध्याअधिक भागात पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना मार्ग काढणेही अवघड झाले होते. रस्त्याच्या एकाच बाजूने वाहने जात असल्याने वेग मंदावला होता. गजानन महाराज मंदिर ते सेव्हन हिल्स भागात रस्ता व फुटपाथच्या मधोमध पाणी साचून चिखल तयार झाल्याने दुचाकीस्वारांचा तोल जात होता.
मनपाच्या ‘ट्रॉफिक वॉर्डन’ची प्रतीक्षाशहरातील वाहतुकीची समस्या गंभीर होत असताना शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी ५० ‘ट्रॉफिक वॉर्डन’ देण्याची घोषणा केली. हे प्रशिक्षित वॉर्डन रस्त्यावर उतरल्यास नियमन व्यवस्थित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.