शहरातील सर्वाधिक वर्दळीचा म्हणून जालना रोड ओळखळा जातो. जालना रोडवरून शहरातील नागरिक दिवसातून एकदा तरी जात असतो. यामुळे या रस्त्यावर बाराही महिने रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. जालना रोडवरून प्रवास करताना आकाशवाणी चौक आणि शासकीय दूध डेअरी चौकात वाहनचालक अडकला नाही, असे कधीही होत नाही. दिवाळीच्या खरेदीसाठी शहरवासीय घराबाहेर पडत असल्याने सकाळ- सायंकाळप्रमाणेच दिवसभरही वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी, वाहनचालकांना आकाशवाणी चौकात आणि पुढे शासकीय दूध डेअरी चौकात दहा मिनिटांहून अधिक काळ वाहतूक कोंडीमुळे पुढे जाता येत नाही. देवळाई चौकात सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जड वाहने सुसाट धावतात. वाहतूक सिग्नल सुरू असताना सिग्नल तोडून पळणारे पोलिसांना जुमानत नाहीत. परिणामी, हा चौक जीव मुठीत धरून ओलांडवा लागतो.
कोट
शहरातील रस्ते अनेक वर्षांपासून जसेच्या तसेच आहेत. दुसरीकडे मात्र रोज नवीन वाहनांची भर पडत आहे. सध्या दिवाळीनिमित्त नागरिक खरेदीसाठी बाजारात गर्दी करीत असल्याने वाहतूक मंदावते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस सिग्नल बंद करून हाताने वाहतूक नियमन करीत असतात. दूध डेअरी चौकातील रस्ता प्रायोगिक तत्त्वावर सायंकाळी ६ ते ८ कालावधीत एकेरी करण्यात आला. यामुळे सायंकाळी तेथे कोंडी होत नाही. देवळाई चौकातही पोलीस कर्मचारी रात्री उशिरापर्यंत वाहतूक नियमन करतात.
-मुकुंद देशमुख, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक